- 152 उद्योगामध्ये 6 हजार 756 रोजगार निर्मिती होणार
- उद्योजकांना एक खिडकीद्वारे सर्व सुविधा मिळणार
नागपूर, दि. २०: विदर्भात विविध क्षेत्रात झालेल्या सांमजस्य कराराचे प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये रुपांतर व्हावे, यासाठी उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा व विभागीयस्तरावर विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. उद्योजकांनी मोठया प्रमाणात विभागात गुंतवणूक करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
उद्योग सहसंचालक कार्यालयातर्फे विभागीयस्तरावर गुंतवणूक परिषद – 2025 चे आयोजन येथील नियोजन भवनाच्या सभागृहात करण्यात आले. या परिषदेत 152 उद्योजकांचे 6 हजार 100 कोटी रुपयांचे सामंज्यस्यकरार श्रीमती बिदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
यावेळी उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष झुलपेस शहा, हिंगणा एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष पी.मोहन, बुटीबोरी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोर मालविया, मैत्रीचे समन्वय अधिकारी भास्कर मोराडे, सिडबीचे सहायक महाव्यवस्थापक संतोषराव मोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.एस.मुद्दमवार तसेच उद्योजक, गुंतवणुकदार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभागीय गुंतवणुकदार परिषदेमध्ये गोदिंया येथे एक्सलोपॅक इंडिया लिमिटेड या हायटेक पेपर इंडस्ट्रिज व पॅकेजिंग क्षेत्रातील कंपनीतर्फे 950 कोटी, तसेच पेपर उद्योगात 225 कोटी रुपयांच्या गुंतवणुकी संदर्भात शशांक मिश्रा यांनी केली आहे. बुटीबोरी येथे इंनव्हेन्टीस रिसर्च कंपनीतर्फे औषध व रासायनिक निर्मिती क्षेत्रात 700 कोटी रुपयाची गुंतवणूक, हॉटेल ताज गेटवे (पीडी प्रॉपर्टीज) पर्यटन क्षेत्रात 400 कोटी, हयात हॉटेल (रचना प्रॉपर्टीज) पर्यटन क्षेत्रात 300 कोटी रुपये फेयर व्हॅल्यु हॉस्पीटॅलिटी क्षेत्रात 131 कोटी 30 लक्ष रुपये, हॉटेल हिलटॉन तर्फे पर्यटन क्षेत्रात 175 कोटी रुपये, विठोबातर्फे 100 कोटी रुपये आदी 125 उद्योजकांनी 6 हजार 100 कोटी रुपयाचे सामंजस्य करार यावेळी केले.
औद्योगिक गुंतवणुकीकरिता पोषक वातावरण निर्माण करतानाच उद्योजकांना सुलभ सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असून दावोस येथे झालेल्या वर्ड इकानॉमिक फोरममध्ये राज्यात 15.60 लक्ष कोटीचे सामंजस्यकरार झाले आहेत. जिल्हास्तरावर गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी उद्योजकांना रेड कारपेटसह आवश्यक सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देत असल्याचे श्रीमती बिदरी यांनी यावेळी सांगितले.
विभागीय गुंतवणुक परिषदेमध्ये विविध क्षेत्रात गुंतवणुक होत असून यामध्ये पर्यटन व उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणुक होत आहे. गडचिरोली जिल्हा स्टिलहब म्हणून विकसित होत असून मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणुक येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसाच्या विशेष कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत उद्योजक व गुंतवणुकदारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी जिल्हास्तरावर तर विभागीय आयुक्त विभागीयस्तरावर आढावा घेऊन उद्योजकांच्या अडचणी सोडवतील असे विभागीय आयुक्त बिदरी यांनी सांगितले.
उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात दावोस येथील परिषदेमध्ये विदर्भासाठी 7 लक्ष कोटीचे करार झाले असून यामध्ये नागपूर जिल्ह्यासाठी 1 लक्ष 6 हजार कोटीचे सामंजस्यकरार झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लघु व मध्यम क्षेत्रात गुंतवणुक यावी यासाठी उद्योग विभागातर्फे प्रयत्न आहेत. विभागात औद्योगिक, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, सेवाक्षेत्रासह विविध उद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. ईज ऑफ डुइंग बिजनेस मध्ये शासनाने पारदर्शकता आणली असून मैत्री कायदा पारित केला आहे. याची अंमलबजावणी मैत्री पोर्टलद्वारे होत असल्याने उद्योजकांना सर्व सुविधा एका खिडकीद्वारे प्राप्त होत असल्याचे यावेळी उद्योग सहसंचालक भारती यांनी सांगितले.
विविध क्षेत्रात उद्योग सुरु करण्यासाठी सामंजस्य करारानंतर प्रत्यक्ष 80 ते 90 टक्के उद्योजकांनी प्रत्यक्ष उद्योग सुरु करण्याला सुरुवात केली आहे. नागपूर हे वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने मध्यवर्ती असल्यामुळे उद्योजक येथे आकर्षित होत आहे. भारतातील पहिला अत्याधुनिक कागद उद्योग सुरु करणारे झेलोपॅक इंडिया लिमिटेडचे शशांक मिश्रा व इंनव्हेन्ट्री रिसर्च कंपनीचे डॉ. दीपक बिरेवार यांनी येथे तंज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन व आभार उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक एस.एस.मुद्देमवार यांनी मानले.
०००