जलसंधारणासाठी कटिबद्ध राहूया- मंत्री गुलाबराव पाटील

राष्ट्रीय जल दिनानिमित्त आवाहन

जळगाव दि. २१ (जिमाका): २२ मार्च, जागतिक जल दिन! या निमित्ताने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातील जनतेला जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले आहे. ते म्हणाले, “पाणी हे निसर्गाने दिलेले अमूल्य वरदान आहे. मात्र, हे वरदान आपण जपले नाही तर भविष्यात भीषण संकट उभे राहू शकते. म्हणूनच जलसंधारण, पाणी पुर्नवापर, टाकाऊ जल व्यवस्थापन, जलसाक्षरता आणि जबाबदारीने पाण्याचा वापर या मुद्द्यांकडे सर्व नागरिकांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.”

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला आजही काही भागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून सरकारने अनेक महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत. जलजीवन मिशन, हर घर जल योजना, ग्रामीण भागातील शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्प आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या योजनांमधून नागरिकांना पाणी आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे.

“पाणी ही फक्त निसर्गाची देणगी नाही तर, ती आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक जबाबदारी आहे.” असे सांगत पालकमंत्री पाटील यांनी जनतेला जलसंधारणाचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. “पाणी अडवा, पाणी जिरवा” या तत्त्वावर चालत महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

०००