- मुख्यमंत्री यांचा १०० दिवसीय कृती आराखडा…
- १०० दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमात प्रत्येक शासकीय कार्यालयाने सहभाग नोंदवणे बंधनकारक, या अंतर्गत सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम आला पाहिजे
- जिल्हाधिकारी कार्यालयाचा सनद वाटप कार्यक्रम कौतुकास्पद
- जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही त्वरित बसवून घ्यावेत
- सोलापूर जिल्ह्यात गुंतवणूक व उद्योग वाढीसाठी उद्योगस्नेही वातावरण निर्माण करावे
सोलापूर, दि.२१ (जिमाका): मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे राज्यात सर्वत्र 100 दिवसीय कृती आराखड्याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात या अंतर्गत काम सुरू आहे. या कार्यक्रमातून सर्वसामान्यांचा शासकीय कार्यालयाकडे पाहण्याचा पूर्वीचा नकारात्मक दृष्टिकोन बदलून सकारात्मक दृष्टिकोन व्हावा तसेच या कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावर सोलापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला पाहिजे, असे आवाहन विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित 100 दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत डॉ. पुलकुंडवार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, उपजिल्हाधिकारी महसूल तथा प्रभारी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्यासह सर्व संबंधित विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले की, या शंभर दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमात जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयानी सक्रिय सहभाग घेणे बंधनकारक आहे जरी अद्याप यात सहभागी झालेले नाहीत अशा कार्यालयांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून आराखड्यातील सातसूत्री कार्यक्रमाची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. सोलापूर जिल्हा प्रशासन या अंतर्गत चांगले काम करत असून या अंतर्गत राज्यस्तरावर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले.
या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाचा पोट खराबा जमीन तसेच बिगर शेती असलेल्या जमिनीसाठी सनद वाटप कार्यक्रम हा अत्यंत चांगला असून राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा वेगळा व लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण कार्यक्रम असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगून अभिलेखासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून त्या अनुषंगाने अभिलेखाचे निंदनीकरण व सुसूत्रीकरण केले जात असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याप्रमाणेच सोलापूर जिल्हा परिषद तसेच महापालिकाअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवून घेण्याची कार्यवाही त्वरित पार पाडावी. यासाठी आवश्यक निधी शासकीय तसेच सीएसआर फंडातून उपलब्ध करून घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले.
सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांचे कार्यालय तसेच कार्यालय परिसर स्वच्छता, घरे तसेच अभ्यागतासाठी असलेली स्वच्छतागृहे कायमस्वरुपी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची असेल. जिल्हास्तर तसेच तालुका स्तरावरील सर्व कार्यालय प्रमुखांनी या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावी. आपण केलेल्या कामकाजाचे श्रेष्ठ संस्थेकडून तपासणीचे काम लवकरच सुरू होणार आहे तरी यात आपला जिल्हा चांगले कामकाज करेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
जिल्ह्यात गुंतवणूक झाल्यानंतर उद्योगवाढ मोठ्या प्रमाणावर होऊ शकते त्या अनुषंगाने गुंतवणूक तसेच पायाभूत प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्याचे वातावरण उद्योगस्नेही असले पाहिजे. या अंतर्गत कोणीही अडचण करत असेल तर संबंधितावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून लक्ष ठेवले जात असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार सांगीतले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा प्रशासन 100 दिवशी कृती आराखड्याअंतर्गत करत असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. तसेच नाविन्यपूर्ण कामकाजाची ही माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती सादर केली.
प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी या अंतर्गत महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाचे सादरीकरण केले. यावेळी प्रांतस्तरावर प्रांताधिकारी व तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी ई- उपस्थित होते.
०००