कोल्हापूर, दि. २१ (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !! हा मूलमंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी समाज कल्याण विभाग कार्यरत राहणार असून भविष्यात शिक्षणासाठी मुला – मुलींचे वसतिगृह उभारण्याला हा विभाग प्राधान्य देईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले.
माणगाव परिषदेच्या 105 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अशोक माने होते.
मंत्री शिरसाट म्हणाले की, माणगाव परिषदेपासून बाबासाहेबांच्या रुपाने संपूर्ण जगाला एका महान व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाला. तत्कालीन कालखंडात आपल्या कार्यरुपाने बाबासाहेबांनी क्रांती केली. माणगाव येथील लंडन हाऊसच्या दुरुस्तीचे कामकाज सुरू करावे, त्यासाठी निधी दिला जाईल.
आमदार माने म्हणाले की, येथे चित्र व फिल्म रूपाने बाबासाहेबांचे चरित्र उभे करणारे दालन निर्माण करावे, तसेच सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या आराखड्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आपला शुभेच्छा संदेश पाठवला.
माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी प्रास्ताविक केले तर बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी आभार मानले. यावेळी मंत्री शिरसाट यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास सहकुटुंब भेट देवून अभिवादन केले तसेच हॉलोग्राफी शो व लंडन हाऊसच्या प्रतिकृतीची पाहणी केली. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तक प्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार राजू आवळे माजी आमदार सुजित मिणचेकर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, बार्टीच्या निबंधक इंदिरा असवार, रवींद्र माने, प्रकाश पाटील, अनिल कांबळे, प्रांताधिकारी मोसमी चौगुले – बर्डे गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
०००