विधानपरिषद प्रश्नोत्तरे

राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत विद्यावेतन देण्यात येणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि.२१ : राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत विद्यावेतन मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी यंदाचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी विद्यावेतनाचा तपशील सादर करण्याविषयी सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपस्थिती केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री मुश्रीफ बोलत होते.

मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, काही शासकीय आणि खासगी महाविद्यालयांनी आवश्यक माहिती वेळेत दिली नव्हती. त्यामुळे शासनाने यासंदर्भात नोटीस काढून संबंधित महाविद्यालयांना सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी आवश्यक माहिती दिली असून, पुढील काळात विद्यावेतन वेळेवर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील राहील.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी राज्य शासन सातत्याने लक्ष देत आहे, असेही त्यांनी  सांगितले.

यावेळी सदस्य विक्रम काळे, राजेश राठोड यांनी याविषयीच्या चर्चेत सहभागी नोंदवला.

००००

राजू धोत्रे/विसंअ

छत्रपती संभाजीनगर येथील घाटीतील नवीन शस्त्रक्रिया इमारतीच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई,दि. २१ : छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता नवीन शस्त्रक्रिया इमारत उभारण्यासाठी ७६५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या महिनाभरात निविदा प्रक्रिया राबवून इमारत उभारणी करण्याच्या बांधकामास सुरुवात केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील घाटीतील नवीन शस्त्रक्रिया इमारतीच्या उभारणीसंदर्भात सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री मुश्रीफ बोलत होते.

मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, निविदा प्रक्रियेसाठी एका महिन्याचा कालावधी असेल, आणि त्यानंतर तातडीने काम सुरू करण्यात येईल. शासनाने प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे या कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल. घाटी रुग्णालयाच्या जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

या वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग, रोबोटिक सर्जरी अशा अनेक उपचार केले जातात म्हणून दरवर्षी २५ हजारहून अधिक बाह्यरुग्ण उपचारासाठी येत असतात. विशेषतः खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह विविध भागांतील गरीब आणि गरजू रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे या रुग्णालयाचा विस्तार आणि आधुनिकीकरण होणे अत्यावश्यक असल्याने येत्या काळात नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांसह मराठवाड्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन सुपर स्पेशालिटी विभागामुळे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून, गरजू रुग्णांना चांगल्या उपचार आणि सुविधा मिळतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य संजय केनेकर, प्रसाद लाड यांनी या चर्चेत सहभाग नोंदवला.

०००००००

राजू धोत्रे/विसंअ

शहरातील कुपोषीत माता बालकांनाही मिळणार पोषण आहार –  महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 21 : ग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्यासाठी राज्य शासन पोषण आहार योजना राबवते. त्याच प्रमाणे आता शहरी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी शहरातील मुलांनाही पोषण आहार योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिली.

सदस्य चित्रा वाघ  यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री तटकरे बोलत होत्या.

देशात कुपोषीत माता आणि कुपोषीत बालक यांना चौरस आहार मिळावा यासाठी केंद्र शासनातर्फे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबवण्यात येत असल्याचे सांगून मंत्री तटकरे म्हणाल्या की, अदिवासी भागातील कुपोषण यामुळे कमी झाले आहे. या चौरस आहाराच्या निधीमध्ये वाढ करण्यासाठी अदिवासी विकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसेच राज्यातील प्रत्येक गरोदर माता, बालक, स्तनदा माता यांना चौरस आहार मिळावा ही शासनाची भूमिका आहे. चौरस आहारामध्ये पुरवण्यात येणाऱ्या आहाराची वेळोवेळी तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये त्या आहारात काही त्रृटी आढळल्यास तो परत पाठवला जातो. तसेच कुपोषीत बालक, माता यांना पुरक आहारही पुरवण्यात येतो अशी माहिती मंत्री तटकरे यांनी सभागृहात दिली.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

गैरप्रकार रोखण्यासाठी डीबीटी व ऑनलाईन निवड प्रक्रिया – मंत्री जयकुमार गोरे

मुंबई,  दि. 21 : कृषी औजारे खरेदी योजना तसेच कृषीच्या इतर योजनांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नयेत आणि गरजू लाभार्थ्यांनाच त्याचा लाभ व्हावा यासाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) तसेच लाभार्थींची संख्या जास्त असल्यामुळे लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड केली जात असल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिली.

सदस्य जयंत आसगावकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री गोरे बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये अमोल मिटकरी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

कृषी औवजारांच्या खरेदी योजनांमध्ये आता आधी औवजारे खरेदी करून त्याची पावती द्यावी लागते असे सांगून मंत्री गोरे म्हणाले की, या औवजारांच्या खरेदीनंतर अनुज्ञेय असलेले अनुदान लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे दिले जाते. लाभार्थ्यांची निवड करताना कागदपत्रांची आवश्यकता असते. पण, आता कमीतकमी कागदपत्रे सादर करावी लागतात. जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था असल्यामुळे जिल्हा परिषदांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांवर किती निधी खर्च करावा हे ठरवण्याचे अधिकारी जिल्हा परिषदांना आहेत. याविषयी शासनाने कोणत्या घटकावर किती टक्के निधी खर्च करावा याविषयी काही नियम घालून दिले असल्याची माहिती मंत्री गोरे यांनी सभागृहात दिली.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

हिंगोली जिल्ह्यातील १८० पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई, दि. 21 : हिंगोली जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या 616 पाणी पुरवठा योजनांपैकी 180 योजनांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य प्रज्ञा सातव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डिकर बोलत होत्या. यावेळी चर्चेमध्ये सदस्य एकनाथ खडसे, सदाशिव खोत, हेमंत पाटील यांनी सहभाग घेतला.

हिंगोली जिल्ह्यातील नांदुरा गावातील पाणी पुरवठा योजना 1 कोटी 20 लाखाची होती असे सांगून राज्यमंत्री बोर्डिकर म्हणाल्या की, ही योजना 98 टक्के पुर्ण झाली असून यामध्ये काही त्रृटी आढळल्या आहेत. मुदतीमध्ये या त्रृटी दूर न केल्याने संबंधित ठेकेदारास 1 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील 190 योजनांची कामे 75 ते 99 टक्के झाली असून 131 योजनांची कामे 50 ते 75 टक्के झाली  असल्याची माहितीही राज्यमंत्री बोर्डिकर यांनी सभागृहात दिली.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

 हेमंतकुमार चव्हाण/विंसंअ

एमआयडीसीतील अविकसित रिक्त भूखंडांबाबत धोरण आणणार – राज्यमंत्री इंद्रनील नाईक

मुंबई, दि. 21 : राज्यातल्या अनेक एमआयडीसीमध्ये अविकसित भूखंड आहेत. हे भूखंड परत घेण्याची तरतूद असली तरी त्यामध्ये काही अडचणी आहेत. या सर्व अडचणी दूर करून या भूखंडांबाबत धोरण तयार करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री नाईक बोलत होते. यावेळी सदस्य एकनाथ खडसे, परिणय फुके, दादाराव केचे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारणीसाठी एमआयडीसीचा विकास करण्यात येत असल्याचे सांगून राज्यमंत्री नाईक म्हणाले की, ज्याठिकाणी भूखंडाचा विकास कालावधी संपलेला आहे. ते भूखंड परत घेण्याविषयी कारवाई करण्यात येत आहे. नोटीस काढण्यात आली आहे. याबाबत कालबद्ध कारवाई करण्यात येईल. अमरावती जिल्ह्यातील एमआयडीसीविषयीही ठोस कार्यवाही करण्यात येईल. तसेच आर्वी येथील एमआयडीसीचे प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री नाईक यांनी सभागृहात दिली.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ