पंढरपूर- लोणंद रेल्वे प्रकल्पाच्या कामाचा विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याकडून आढावा 

सोलापूर, दि. २१ (जिमाका): पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गाच्या क्षेत्राच्या संपादनाबाबत विभागीय महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नियोजन भवन येथे आढावा घेतला. महसूल विभागाकडील नोंदी, गाव नकाशे तसेच भूमी अभिलेख यांच्याकडील नोंदी व नकाशे याद्वारे या रेल्वे मार्गाच्या क्षेत्राची तपासणी करण्यात यावी, असे त्यांनी सूचित केले.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, माळशिरस च्या उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक श्री. घोडके, रेल्वे विभागाचे अधिकारी तसेच मंडल अधिकारी व तलाठी उपस्थित होते.

पंढरपूर – लोणंद रेल्वे प्रकल्पाचे भू-संपादनाबाबतचे जुने रेकॉर्ड रेल्वे विभागाकडे असू शकते त्या अनुषंगाने रेल्वे विभागाच्या रेकॉर्डची जबाबदारी असलेल्या कार्यालयाने त्यांच्या स्तरावर अभिलेखाची तपासणी करावी व ते रेकॉर्ड सोलापूर जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून द्यावे. या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासन चांगले काम करत असून रेल्वे विभागानेही त्यांना तेवढेच सहकार्य करावे, अशी सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी केली.

या रेल्वे प्रकल्प अंतर्गत माळशिरस तालुक्यातील बारा व पंढरपूर तालुक्यातील 5 गावांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जुन्या गावांची विभागणी झाल्याने माळशिरस तालुक्यात तीन गावे तर पंढरपूर तालुक्यात दोन गावे वाढलेली असून एकूण गावांची संख्या 20 इतकी झाली आहे. हा रेल्वे मार्ग ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग आहे. या मार्गाच्या क्षेत्राचे संपादन हे मूळ जमाबंदीच्या वेळी झाल्याने त्याचा स्वतंत्र सातबारा तयार झालेला नाही. प्रत्येक गावाच्या आकारबंधाचे तेरजस रेल्वेचे क्षेत्र नमूद आहे. सन 1929 मध्ये या जमीन गटाच्या नोंदी घेण्यात आलेल्या होत्या तर सन 1949 साली वरील संपादित जमीन अधिक धान्य पिकवा या योजनेखाली एकसाली लागवडीने देण्यात आलेल्या आहेत.

०००