इंदरदेव धनगरवाडा येथे वणवा बाधित घरांची पुर्नबांधणी होणार – मंत्री आदिती तटकरे

मुंबई,दि. २१: रायगड जिल्ह्यातील इंदरदेव धनगरवाडा येथे नुकतेच वणव्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त गावकऱ्यांच्या घरांची पुनर्बांधणी त्याच ठिकाणी करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

रोहा तालुक्यातील मौजे धामणसई हद्दीतील इंदरदेव धनगरवाडा येथील जंगलातील वणव्याची आग पसरुन बाधित झालेल्या ठिकाणी सोई सुविधाकामी निधी उपलब्ध होण्याबाबत विधिमंडळात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, धनगरवाडा येथे 6 मार्च 2025 रोजी जंगलातील वणव्याची आग पसरुन 39 घरे आणि 12 जानावरांचे गोठे बांधित झाले होते. या बाधित घराचे व गोठ्यांचे झालेल्या नुकसान झाले असून, ज्या ठिकाणी नुकसान झाले त्याच ठिकाणी त्यांच्या घरांची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे.   इंदरदेव धनगरवाडीला जाणेसाठी रस्ता नसल्याने लागलेल्या आगीवर नियंत्रण करता आले नाही. इंदरदेव धनगरवाडा येथे जाण्यासाठी अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता होण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत धामणसई यांनी ठराव करुन प्रस्ताव सादर करावा, असेही  त्यांनी सांगितले.

यावेळी रोहा येथील उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, रोहा तालुक्याचे तहसीलदार किशोर देशमुख, रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील, रोहा वन परिक्षेत्रचे वन अधिकारी मनोज वाघमारे, सहाय्यक वनरक्षक रोहित चोबे, ग्रामविकास अधिकारी निता श्रीवर्धनकर, तानाजी देशमुख, अनंता देशमुख तसेच इंदरदेवचे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

***

गजानन पाटील/विसंअ

०००