नागपूर, दि. २२: जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून दक्षिण मध्य सांकृतिक केंद्र येथे आयोजित जिल्हास्तरीय नवसखी सरस महोत्सवाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी यावेळी उपस्थित होते.
नवसखी सरस महोत्सवात एकूण शंभर स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या स्टॉल्सची पाहणी करीत मुख्यमंत्र्यांनी स्टॉलधारक महिलांशी संवाद साधला. २६ मार्चपर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हे शासनाचे धोरण यशस्वी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. त्यासाठी विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. या संकल्पनेतूनच हे आयोजन करण्यात आले आहे.
०००