मुंबई दि. २२ : ‘शिका व कमवा’ योजनेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राकरीता उपयुक्त असे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यामध्ये तांत्रिक कौशल्य विकसीत होण्यास मदत होणार आहे. शिक्षणाबरोबर रोजगाराचाही पर्याय उपलब्ध या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 24, मंगळवार दि.25 आणि बुधवार दि. 26 मार्च 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 25 मार्च 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व राज्यातील विविध संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ‘शिका व कमवा’ या उपक्रमास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी राष्ट्रीय कौशल्य विकास उपक्रमांतर्गत केली जाणार असून, उद्योगधंद्यातील कुशल मनुष्यबळाच्या वाढत्या मागणीला पूरक ठरणार आहे. या उपक्रमात राज्यातील इच्छुक संस्था, उद्योगसमूह आणि संबंधित तज्ञ यांना सहभाग घेता यावा याकरिता महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने धोरणात्मक रूपरेषा निश्चित केली आहे. यासाठी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने अल्पमुदतीचे शासनमान्य पदविका अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. ‘शिका व कमवा’ ही योजना काय आहे, राज्यात या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार आहे याविषयी मंत्री पाटील यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
०००