- मालवणी भाषा भवन उभारणार
- साहित्यांचे डिजिटायजेशन होणे आवश्यक
- तरुणांनी वाचन संस्कृती जोपासावी
सिंधुदुर्गनगरी दि. २२ (जिमाका): सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्य संस्कृती फार मोठी आहे. या जिल्ह्याने अनेक साहित्यिक, लेखक घडविले आहेत. दुर्मिळ साहित्यांचे जतन करणे जेवढे आवश्यक असते तेवढेच ते साहित्य सर्वांसाठी उपलब्ध करुन जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचणेही गरजेचे आहे. या दोन्ही गोष्टी परस्परांना पूरक असून वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी आवश्यक आहेत. पालकमंत्री म्हणून साहित्याचे जतन करून वाचक वाढविण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष गंगाराम गव्हाणकर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, प्रांतअधिकारी हेमंत निकम आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले की, पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. कोकणातील सर्व साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून कोकणची प्रतिमा सर्वदूर पोहचविणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत जुन्या साहित्याचे डिजिटलायझेशन होणे आवश्यक आहे. नव्या पिढीला वाचनाची गोडी लावायची असेल तर केवळ पारंपरिक मार्गावरून चालता येणार नाही. त्यासाठी नव्या पिढीचे नवे मार्ग, नवी माध्यमे हाताळावी लागतील. ही साहित्य चळवळ पुढे अविरत चालू ठेवण्याच्या दृष्टीने कोकण मराठी साहित्य परिषदेने सावंतवाडी येथे घेतलेले हे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे.
पालकमंत्री म्हणाले की, वाचन चळवळ वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जुन्या ग्रंथाचे जतन करणे आवश्यक आहे. आजची तरुण पिढी ई-बुक किंवा किंडलच्या माध्यमातून वाचन करत असते. म्हणून त्यांच्यासाठी ही ग्रंथसंपदा कशी उपलब्ध करता येईल यासाठी देखील प्रयत्न होणे आवश्यक आहे. ग्रंथालयांचा डिजिटलायझेशन करण्यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे. जेणेकरुन जिल्ह्याच्या ग्रंथालयांची परिस्थिती बदलू शकते. जिल्हा ग्रंथालयांच्या विकासासाठी आराखडा तयार केला आहे. तसेच पुढील आर्थिक वर्षामध्ये ग्रंथालयाच्या विकासासाठी निधीची देखील तरतूद केली असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यात कोकणचा मोठा सहभाग आहे. मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह परिसरात मराठी भाषा भवन बांधले जात आहे. आपण आपल्या कोकणामध्ये ‘मालवणी भाषा भवन’ उभारुया. त्यानिमित्ताने आपली मालवणी बोलीभाषा भावी पिढीपर्यंत पोहोचवता येईल, त्याबद्दल आपण सर्वजण एकत्र येऊन चर्चा करूया, असेही ते म्हणाले.
०००