पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून मिलेट रॅलीत जनजागृती

कृषी विभागाकडून पौष्टिक तृणधान्य महोत्सव व मिलेट बाईक रॅली

कोल्हापूर, दि. २२ (जिमाका): पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग कोल्हापूर यांच्यावतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन २०२४-२५ योजनेअंतर्गत मौजे कुर ता. भुदरगड येथे आयोजित मिलेट महोत्सवाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला. रॅलीचे कुर -कोनवडे- नीळपण- दरवाड- म्हसवे- गारगोटी – कुर या मार्गावर आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री आबिटकर यांनी बुलेट चालवत या रॅलीमध्ये इतरांना प्रोत्साहित केले. यावेळी पालकमंत्र्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ च्या पौष्टिक तृणधान्य स्टॉलना भेट देत कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेतून लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटरचे वाटप केले.

या महोत्सवात उपस्थित शेतकरी बांधवांना डॉ. योगेश बन यांनी बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार याबाबत सांगितले. यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज बनली आहे. आहारात नाचणी, वरई, ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, सावा, कोडो, कुटकी यासारखी पौष्टिक तृणधान्ये असावीत. लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडिन अशा पोषक घटकांनी समृद्ध असून ग्लुटेनमुक्त असल्याचे सांगितले. शेतकरी मिलिंद पाटील यांनी पौष्टिक तृणधान्य लागवडीबद्दल त्यांचे अनुभव कथन केले. ऊस लागवडीबाबत सुरेश माने-पाटील यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत मृत शेतकऱ्यांच्या 19 वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे मंजुरीपत्र देण्यात आले. त्याचबरोबर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनंतर्गंत फळबाग लागवड उत्कृष्टपणे राबवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. महोत्सवात पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 150 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

प्रथम तीन महिलांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील (कोल्हापूर विभाग) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रकल्प संचालक (आत्मा) रक्षा शिंदे, कोल्हापूर, गोकुळ दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले (अशासकीय सदस्य) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे मदन देसाई, अजित देसाई, माजी उपसभापती (भुदरगड) मदन पाटील, कुरचे सरपंच कल्याण निकम, अशोक फराकटे,अशोक व भांदिगरे, बाबा नांदेकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन किरण पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी गडहिंग्लज, नितीन भांडवले, तालुका कृषी अधिकारी, भुदरगड, सुनील कांबळे, आत्मा (बीटीएम ) यांनी नियोजन केले. या कार्यशाळेस शेतकरी, प्रक्रियादार, नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दर्शविला.

०००