अमरावती, दि. २२ : येत्या काळात शेती आणि जलसंवर्धन क्षेत्रात नवीन दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. यासाठी पुढील शतकाचा वेध घेऊन आज कार्य करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने भविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी, त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय मंत्री गडकरी यांना शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, प्रवीण पोटे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कमलताई गवई आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात डॉ. पंजाबराव देशमुख यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यातूनच मागास भागाचा बदल घडविणे शक्य झाले. सामाजिक सुधारणा या काळ बदलविणाऱ्या असतात. त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा मिळते. समाजाप्रती त्यांचा असलेला दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याने त्यांच्या विचारावरच मार्गक्रमण करण्यात येत आहे.
येत्या काळात ज्ञान हीच शक्ती राहणार आहे. त्यामुळे शेतीच्या क्षेत्रात जगभरात होत असलेल्या प्रयोगाची माहिती घेऊन त्यानुसार आपल्यातही बदल घडून येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनीही शेतीमध्ये बदल घडविताना आधुनिक शिक्षण मार्गदर्शक ठरणार आहे. शेतीतील प्रयोग यशस्वी होण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी पुरस्काराची संकल्पना ही गरजेची आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी यासाठी त्यांना प्रशिक्षणही देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पुरस्काराच्या मिळालेल्या पाच लाख रुपयांमध्ये वीस लाख रुपयांची भर घालून त्यातून दरवर्षी पाच शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात यावा, असे आवाहन केले.
प्रारंभी हर्षवर्धन देशमुख यांनी संस्थेचे कार्य आणि पुरस्काराबद्दल माहिती दिली. यावेळी मिथीला कवीश्वर, श्रीमती राठोड, वैष्णवी मानवटकर, वैष्णवी कदम, समीक्षा नागापुरे, धनश्री मोये, आयुष्य दिवाण, सौम्या राऊत, दीप्ती काळमेघ यांना विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल अभ्यासवृत्ती प्रदान करण्यात आली. उत्कृष्ट महिला शेतकरी वंदना धोत्रे आणि वंदना वैद्य यांचा सन्मान करण्यात आला. तसेच नवनियुक्त आमदार संजय खोडके यांचा सत्कार करण्यात आला.
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या नवीन इमारत आणि कार्डीयाक कॅथलॅबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, दादाराव केचे, सुलभा खोडके, प्रताप अडसड, उमेश यावलकर, केवलराम काळे, सुमित वानखेडे, राजेश वानखेडे, प्रवीण तायडे, प्रवीण पोटे, सचिन देव महाराज आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी गोरगरीब जनतेची सेवा ही महत्त्वाची असून अशा कार्यांना कायम मदत केली जाईल. रुग्णालयामार्फत देणगी आणि नागरिकांच्या सहभागातून शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. यातून अनेकांचे प्राण वाचले. गरजूंना मदत झाली. त्यामुळे संत अच्युत महाराजांना अभिप्रेत असलेली सेवा घडली आहे. या रुग्णालयाचा तळागाळातील नागरिकांना लाभ होणार आहे. येत्या काळात फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण आदींच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयाने पुढाकार घ्यावा. रुग्णालयाच्या विकासाचे ध्येय ठरविण्यात यावे. तसेच येत्या काळातही रुग्णालयाने निस्वार्थी भावनेने कार्य करावे, असे आवाहन केले.
शारदा उद्योग मंदिराला भेट देऊन महिला उद्योगाबद्दल मत व्यक्त करताना त्यांनी उद्योगात महिलांनी पुढे येण्याची गरज आहे. यासाठी महिलांनी कौशल्य आत्मसात करावे. दर्जेदार सेवा दिल्यास त्यातून उत्तम उत्पन्न मिळू शकेल,असे मत त्यांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पंचवटी येथील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळा आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दरम्यान बेलोरा विमानतळ येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आगमन झाले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर, प्रविण पोटे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते.
०००