राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार यांच्यावरील जीवनचरित्राचे प्रकाशन

मुंबई, दि. २२: फुटीरतावादी प्रवृत्ती आजही देशाच्या काही राज्यांमध्ये सक्रिय असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा एकतेचा संदेश आज पूर्वीपेक्षाही अधिक प्रासंगिक आहे असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते शनिवारी डॉ. हेडगेवार यांच्यावरील जीवन चरित्राचे राजभवन, मुंबई येथे प्रकाशन पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

ब्रिटिश भारतीय युवा लेखक सचिन नंदा यांनी ‘हेडगेवार : अ डेफिनिटिव्ह बायोग्राफी’ या इंग्रजी चरित्रात्मक ग्रंथाचे लेखन केले आहे.

आपसात एकी नसल्यामुळे अवघ्या काही हजार ब्रिटिशांनी भारतावर अनेक दशके राज्य केले असे सांगून फुटीरतेमुळे महाराणा प्रताप यांना देखील पराभव पाहावा लागला होता, मात्र छत्रपती शिवाजी महाराज अशा फुटीर प्रवृत्तींना पुरून उरले, असे राज्यपालांनी सांगितले.

परकीय शासकांमुळे भारत एकसंध राष्ट्र झाले असे चुकीचे दावे केले जातात असे सांगून सम्राट अशोक यांच्या काळात भारत कितीतरी दूरपर्यंत जोडला गेला होता, असे राज्यपालांनी सांगितले. सांस्कृतिक व अध्यात्मिकदृष्टया भारत नेहमीच एक राष्ट्र होते असे त्यांनी सांगितले.

यावेळी लेखक सचिन नंदा यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाशन सोहळ्याला एशियन पेंट्सचे प्रवर्तक जलज दाणी, आवादा ग्रुपचे अध्यक्ष विनीत मित्तल, मोहित डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक मोहित मेहता, लेखक सचिन नंदा, एनएसईचे प्रमुख डॉ. आशिषकुमार चौहान, रवींद्र संघवी, मिलिंद घुमरे आणि इतर निमंत्रित उपस्थित होते. समीर कोपीकर यांनी आभार मानले.

०००