विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेला उपस्थिती

नागपूर , दि. २२:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग कल्याणाची धोरण निश्चिती केली आहे. विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांना  रोजगार, शिक्षण अशा सर्व गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे. राज्य शासनाने देखील अशा प्रकारच्या अनेक योजना आखल्या असून दिव्यांगासाठीच्या राखीव निधीचा योग्य विनियोग व्हावा, या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे, क्रीडा संचालनालय आणि स्वर्गीय प्रभाकर दटके स्मृती सेवा संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग येथील मैदानावर राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्पर्धास्थळी भेट दिली, तसेच स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

अत्यंत उत्साहाने या स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ही अतिशय उत्साहवर्धक गोष्ट आहे. दिव्यांगाकरता काम करणाऱ्या संस्थांच्या असलेल्या अडचणी देखील दूर करण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. या संस्थांच्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणींवर देखील मात करण्यात येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पॅरा ऑल्मिपिकमध्ये खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. अनेक क्रीडा प्रकारात त्यांनी पदके पटकावली आहेत. त्यांचाही येत्या काळात यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. कुठल्याही खेळात जीत व हार यापेक्षा सांघिक भावना महत्त्वाची असते. ज्यांच्यामध्ये संघ भावना तयार होते ते जगाच्या कुठल्या क्षेत्रात गेले तरी मागे वळून पाहत नाहीत. स्पर्धेत सहभागी होणे हेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार प्रवीण दटके, स्वर्गीय प्रभाकरराव दटके ट्रस्टचे प्रमुख सुभाष राऊत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह राज्यातील विविध भागातून आलेले दिव्यांग खेळाडू उपस्थित होते.

०००