आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट                            

नागपूर,दि. 23:  प्रादेशिक मनोरुग्णालयाला राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज भेट दिली तेथील व्यवस्थेची पाहणी केली सोबतच येथील मनोरुग्णांशी संवाद साधला.

यावेळी मनोरुग्णालयाचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितिन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर,वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमणे, सहाय्यक संचालक प्रमोद गवई, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आरोग्य मंत्री आंबिटकर यांनी  मनोरुग्णालयाचे महिला आंतररुग्ण विभाग, उड्डाण कक्ष, टेली मानस कक्ष रुग्णांनी बनविलेल्या वस्तु, विणकाम, द्रोण व पत्रावळी कक्षास भेट देऊन तेथील रुग्णांची आस्थापूर्वक विचारपूस केली.  रुग्णांनी केलेली विणकाम, पत्रावळी,  रूमाल व टेबल क्लॉथ आदी वस्तु पाहून  रुग्णांचे कौतुक केले. मनोरुग्णांना सर्व सुविधा मिळतात काय, औषध व इतर बाबी मिळतात काय याबाबत विचारपूस केली.

जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट

आरोग्य मंत्री आबिटकर यांनी निर्माणाधीन जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाची पाहणी केली. इमारतसाठी लागणारे साहित्य आणि टाईल्स  दर्जेदार असावेत, नियोजित काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अभियंत्यांना दिल्या.

00000