विधानपरिषद कामकाज

जिवंत सातबारा मोहीम १ एप्रिलपासून राज्यभर राबवणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २४ : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे जिवंत सातबारा मोहिम यशस्वीपणे राबविण्यात येत असून आता याची दखल घेऊन ही मोहीम संपूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री यांनी विधान परिषदेत दिली.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, या मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अभिलेखामध्ये (सातबारा) अद्ययावत केल्या जातील. यामुळे शेतीशी संबंधित वारसांच्या दैनंदिन कामांमध्ये येणाऱ्या अडचणींवर प्रभावी उपाययोजना होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात 1 मार्च 2025 पासून सुरू झालेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर 19 मार्च 2025 रोजी राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे ही मोहीम सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा आदेश काढला आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही मोहीम 1 एप्रिल 2025 पासून सुरू होईल आणि साधारणतः दीड महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण राज्यातील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट आहे. महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी यावेळी सर्व सदस्यांना आवाहन केले की, त्यांनी आपआपल्या भागात तहसीलदार व एसडीओंच्या बैठकीद्वारे या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.

000

संजय ओरके/विसंअ/

महाराष्ट्र पुराभिलेख भवन उभारणीस मान्यता

मुंबई, दि. २४ : मुंबई येथे महाराष्ट्र पुराभिलेख भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार म्हणाले की, वांद्रे पूर्व येथे 6,691 चौरस मीटर जागेवर महाराष्ट्र पुराभिलेख भवन उभारण्यात येणार आहे. राज्यात जवळपास 17 कोटी ऐतिहासिक कागदपत्रे आहेत, त्यापैकी साडेदहा कोटी मुंबईत आहेत. जगभरात अनेक ठिकाणी पुराभिलेख भवन (Archives Building) पर्यटक, अभ्यासक, आणि संशोधकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. अशा ठिकाणी असलेल्या दस्तऐवजांमुळे त्या शहराची, राज्याची आणि देशाची ऐतिहासिक ओळख जपली जाते. महाराष्ट्र राज्यात अद्यापपर्यंत स्वतंत्र असे महाराष्ट्र पुराभिलेख भवन नव्हते. मात्र, आता हे भवन उभारण्यासाठी वांद्रे पूर्व येथील प्लॉट मिळवण्याची प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. शासनाने तीन महिन्यांतच ही जागा ताब्यात घेतली असून, आता लवकरच या प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्याचे काम सुरू होणार आहे. या 6,691 चौरस मीटर क्षेत्रफळात उभारल्या जाणाऱ्या पुराभिलेख भवनात महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचे जतन करण्यात येईल. याठिकाणी दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज, सरकारी राजपत्रे, शासकीय नोंदी, तसेच ऐतिहासिक कागदपत्रे जतन करून अभ्यासक व संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाला मोठी चालना मिळणार असून, इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हे भवन एक महत्वपूर्ण साधन ठरणार असल्याचेही ॲड. शेलार यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मुंबईत भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय उभारणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. २४ : राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी मुंबईत भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषदेमध्ये याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार यांनी निवेदन केले. श्री. शेलार म्हणाले की, हे सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरेल. येथे भव्य ऑडिटोरियम, कला दालन, संशोधन केंद्र आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी सुविधा उपलब्ध असतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळावी यासाठी हे केंद्र महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. विदेशी आणि देशी पर्यटकांसाठी हे एक प्रमुख आकर्षण असेल. तसेच, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांसाठी एक भव्य व्यासपीठ म्हणूनही या केंद्राचा उपयोग होईल.

वस्तुसंग्रहालयामध्ये प्राचीन वारसा जतन

राज्य वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. येथे महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष, उत्खननात सापडलेल्या प्राचीन वस्तू, शस्त्रास्त्रे, शिलालेख, ताम्रपट, मध्ययुगीन वस्त्रप्रकार, शिल्पे, चित्रकला आणि अन्य दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू प्रदर्शित केल्या जातील.

मुंबईत भव्य प्रकल्पाची उभारणी

राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मौजे वांद्रे, सर्वे नंबर 341, नगर भूखंड क्रमांक 629 या 14,418 चौरस मीटर भूखंडाची निवड करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून हा भूखंड सांस्कृतिक कार्य विभागाला विनामूल्य हस्तांतरित केला जाणार आहे. याठिकाणी राज्याच्या पहिल्या सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालयाची उभारणी करण्यात येईल. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन होईल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

स्टँड-अप कॉमेडीयन कुणाल कामरा यांच्या वक्तव्यांवर शासनाची कठोर भूमिका – गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई दि. २४ : स्टँड-अप कॉमेडीच्या नावाखाली सर्वोच्च न्यायालय, देशाचे प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान होणे, हे अत्यंत गंभीर आहे. यासंदर्भात कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता, श्री.कामरा याचे सी.डी.आर तसेच कॉल रेकॉर्ड तपासले जातील, तसेच त्याच्या बँक खात्यामधील व्यवहार तपासले जातील, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले.

गृहराज्यमंत्री कदम यांनी निवेदनात स्पष्ट केले की, श्री.कामरा यांच्या संदर्भात १६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी उपाययोजना केल्या जातील.

000

संजय ओरके/विसंअ/