विधानपरिषद प्रश्नोत्तरे

बाळापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांची प्रदूषणाच्या दृष्टीने फेरतपासणी – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २४ : बाळापूर तालुक्यात अनेक परंपरागत वीटभट्ट्या कार्यरत असून, त्या अनेक दशकांपासून चालत आलेल्या आहेत. यामध्ये कुंभार समाज प्रमुख असून, ते पारंपरिक पद्धतीने वीटभट्टी व्यवसाय करत आहेत. या व्यवसायामध्ये जवळपास ८५ वीटभट्ट्या परंपरागत आहेत, तर ६४ वीटभट्ट्या खासगी जमिनींवर कार्यरत आहेत. या सर्व वीटभट्ट्यांची प्रदूषणाच्या दृष्टीने फेरतपासणी करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे उत्तर देत होते.

शासनाने या वीटभट्ट्यांची तपासणी केली असल्याचे सांगून महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, यातील काही वीटभट्ट्या सरकारी जमिनींवर कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये ११ वीटभट्ट्या सरकारी जमिनींवर असून, त्यांच्याकडून भाडे आणि महसूल वसूल करण्यात आले आहे. आतापर्यंत ३० लाख ४८ हजार रुपये महसूल स्वरूपात जमा करण्यात आला आहे. यातील बहुतांश वीटभट्ट्या छोट्या असून, त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिक आणि कुंभार समाजातील कुटुंबे यावर अवलंबून असल्याने कारवाई केल्यास ५०-६० कुटुंबांच्या रोजगारावर संकट येऊ शकते. त्यामुळे यासंदर्भात फेरतपासणी करण्याची भूमिका घेतली आहे. यातील अनेक वीटभट्ट्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घेण्याची गरज नसते, कारण त्या लहान उद्योगांच्या श्रेणीत येतात. मात्र, काही ठिकाणी पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याची तपासणी करण्यात येणार आहे. जर कोणी नियमबाह्य मार्गाने व्यवसाय करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

प्रत्येक जिल्ह्यात आदर्श वसतिगृह उभारणार; वसतिगृहांसाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. २४ : राज्यातील  प्रत्येक जिल्ह्यात एक आदर्श वसतिगृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री शिरसाट बोलत होते. यावेळी सदस्य शशिकांत शिंदे, सचिन आहिर, राजेश राठोड, अभिजीत वंजारी, अमोल मिटकरी, जगन्नाथ अभ्यंकर, संजय खोडके यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा दर्जा सुधारण्यात येत असल्याचे सांगून सामाजिक न्याय मंत्री शिरसाट म्हणाले की, याठिकाणी असलेल्या स्वयंपाकगृहांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात आला आहे. त्यानुसार दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना वसतीगृहात वेळेवर प्रवेश मिळावा यासाठीही नियमावली तयार करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील वसतिगृहासाठी पहिल्या टप्प्यात 4 कोटी 99 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लवकरच दुसरा हप्ताही देण्यात येणार आहे. राज्यातील वसतिगृहांमध्ये 1 कोटी 25 लाख विद्यार्थी सामावून घेण्याची क्षमता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक वसतिगृह इमारत ही 10 कोटी रुपयांची असावी असे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांचे ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश आहे त्या महाविद्यालयाच्या जवळच त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळेल असे नियोजन करण्यात येणार असल्याची माहितीही सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी यावेळी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनामध्ये वाढ आणि मच्छिमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वंकष धोरण – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. २४ : गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये वाढ होणे आणि मच्छिमारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी एक सर्वंकष धोरण तयार करण्यात  येत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.

सदस्य परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मत्स्यव्यवसाय मंत्री राणे बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये प्रवीण दरेकर, उमा खापरे, भाई जगताप, प्रसाद लाड, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

गोड्यापाण्यातील मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी या क्षेत्रामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता आणणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. राणे म्हणाले की, यासाठी एक सर्वंकष धोरण विभागामार्फत तयार करण्यात येत आहे. तसेच विभागाकडे असलेल्या सर्व तलावांची माहिती एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मत्स्योत्पादनात सध्या महाराष्ट्र १७ व्या स्थानावर आहे. राज्य मत्स्योत्पादनामध्ये ३ ऱ्या क्रमांकावर यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मासेमारीला कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात येणार आहे. तसेच मत्स्योत्पादन वाढीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येईल. याशिवाय तलावांमधील गाळ काढण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील तलावांमध्ये अतिक्रमणही झाल्याचे निदर्शनास येत आहे. यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री राणे यांनी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/ 

नागपूर येथील प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे  वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. २४ : नागपूर येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राणी संग्रहालय (गोरेवाडा) येथील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाला असल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.

सदस्य मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नाईक बोलत होते.

गोरेवाडा येथील प्राणी संग्रहालयात विषाणुजन्य आजारामुळे प्राण्याचा मृत्यू होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगून वनमंत्री नाईक म्हणाले की, बाधित प्राण्यांचे पिंजरे निर्जंतुक करण्यात आले आहेत. प्रचलित नियमांतील तरतुदीनुसार मृत प्राण्यांचे मृतदेह नष्ट करण्यात आले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अन्य क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी कोंबडीच्या मांसाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. राज्यात पशुवैद्यकीय अधिकारी यांची पदे कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री कार्यालयामध्ये विशेष कार्य अधिकारी म्हणून रुजू असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत माहिती घेवून निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही वनमंत्री नाईक यांनी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/