डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे नाविन्यपूर्ण संकल्पनांसह उत्कृष्ट नियोजन करावे – मुख्य सचिव सुजाता सौनिक

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई, दि. २४ : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.१४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवाचे सर्व संबंधित यंत्रणांनी नाविन्यपूर्ण संकल्पनासह उत्कृष्ट नियोजन करण्याचे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.

मंत्रालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या तयारीच्या अनुंषगाने आयोजित आढावा बैठक झाली. यावेळी भन्ते डॉ.राहूल बोधी महाथेरो, नागसेन कांबळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा तसेच दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी व संबंधित सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या, जयंती उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात चैत्यभूमी परिसरात अभिवादन करण्यासाठी अनुयायी, नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उन्हापासून सुरक्षा करणारी मंडप व्यवस्था त्याचसोबत  सर्व सोयी सुविधा उत्तम दर्जाच्या उपलब्ध ठेवण्यात याव्यात.  त्याठिकाणी प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध ठेवावी.त्याचप्रमाणे दादर व सर्व संबंधित परिसरात वाहतूक पोलीस यंत्रणांनी रहदारीचे योग्य नियंत्रण करुन जागोजागी सूचना फलक लावावेत, बेस्ट मार्फत पूरेशा प्रमाणात दादर स्टेशन ते चैत्यभूमी परिसरासाठी बस सेवा उपलब्ध ठेवावी.

या ठिकाणी मोठ्या संख्येन पुस्तकांची खरेदी नागरिकांमार्फत केली जाते. या पार्श्वभूमीवर विविध दर्जेदार प्रकाशक संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी पुस्तक, ग्रंथ, पूरक साहित्याची विक्री प्रदर्शन यांचे स्टॉल लावण्याचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका, पोलिस, रेल्वे, बेस्ट, माहिती व जनसंपर्क, जिल्हाधिकारी, सांस्कृतिक विभाग, सामाजिक न्याय, व इतर सर्व संबंधितांनी आपल्या स्तरावर जयंती उत्सवाचे नियोजन अधिक व्यापक यशस्वीपणे करण्याच्या दृष्टीने आढावा बैठका घेऊन नाविन्यपूर्ण संकल्पनांसह जयंती साजरी करण्यासाठी नियोजन करण्याचेही श्रीमती सौनिक यांनी यावेळी सूचित केले. महानगरपालिकेमार्फत चैत्यभूमी येथे उपलब्ध करुन देण्यात येणा-या सोयीसुविधा व जयंती उत्सवासाठी करण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती यावेळी सादर करण्यात आली.

0000

वंदना थोरात/विसंअ/