विविध स्पर्धांमधील राज्याच्या खेळाडूंचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानपरिषदेत अभिनंदनपर प्रस्ताव

मुंबई, दि. २५:  राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेली उत्कृष्ट कामगिरी त्याचप्रमाणे खो-खो विश्वचषक स्पर्धा आणि तेहरानमधील कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने मिळवलेले अजिंक्यपद यासाठी उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत अभिनंदनपर प्रस्ताव मांडला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या अभिनंदनपर भाषणात म्हणाले की, उत्तराखंडमधील ३८ व्या क्रीडा स्पर्धेत आपल्या राज्यातील ५८० खेळाडूंनी सहभाग घेतला. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तब्बल २०१ पदके प्राप्त केली आहेत. त्यात ५४ सुवर्ण, ७१ रौप्य व ७६ कास्य पदकांचा समावेश आहे. स्पर्धेतील एकूण ३२ क्रीडा प्रकारांपैकी २६ क्रीडा प्रकारात राज्यातील खेळाडूंनी बाजी मारली आहे. जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात सर्वाधिक १२ सुवर्ण पदकांसह २४ पदके प्राप्त केली आहेत. सर्व राज्यांमध्ये प्रथम येत सलग तीन वेळा पदतालिकेत प्रथम येण्याचा मान महाराष्ट्राने प्राप्त केला आहे, ही आपणा सर्वांना अभिमानास्पद बाब आहे.

त्याचप्रमाणे, भारतीय पुरुष आणि महिला संघाने खो-खो खेळाच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकवल्याबद्धल, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले.

एकीकडे खो-खो स्पर्धेचे जेतेपद मिळवित असताना भारताच्या महिला कबड्डी संघाने तेहरान येथे झालेल्या सहाव्या महिला आशियाई कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले आहे. ही देखील अभिमानास्पद बाब आहे. केवळ क्रिकेट पुरते हे जग सीमित नसून भारतीय खेळाडू कबड्डी तसेच खो-खो खेळातही प्राविण्य दाखवित आहेत. महाराष्ट्र आणि देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिनास्पद बाब आहे. मी सभागृहाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महाराष्ट्रातील खेळाडू तसेच भारतीय पुरूष व व महिला खो-खो संघाचे त्याचप्रमाणे भारतीय महिला कबड्डी संघाचे अभिनंदन करतो, असेही उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.

हा प्रस्ताव विधान परिषदेत सर्वानुमते संमत करण्यात आला.

०००