मुंबई, दि. २६ : मतदार याद्यांचे निरंतर अद्ययावतीकरण करण्याची प्रक्रिया आणि प्रत्येक मतदान केंद्राकरिता राजकीय पक्षांकडून मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नियुक्ती यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत बैठक झाली.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ.गजानन देसाई, भारतीय जनता पक्षाचे गोपाळ दळवी, शिवसेना पक्षाचे विलास जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे रवींद्र पवार, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिन परसनाईक तसेच विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राजकीय पक्ष हे निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचे भागीदार आहेत. भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीशी क्षेत्रिय तसेच राज्यस्तरावर नियमितरित्या बैठका घेऊन निवडणुकीच्या विविध विषयाबाबत समन्वय राखण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील मतदार नोंदणी अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर १७ ते २० मार्च २०२५ या कालावधीत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या स्थानिक प्रतिनिधी समवेत बैठका घेण्यात आल्या असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी यावेळी दिली.
या वेळी बैठकीमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी मतदार याद्यांचे निरंतर अद्ययावतीकरण करण्याची प्रक्रिया आणि प्रत्येक मतदान केंद्राकरिता राजकीय पक्षांकडून मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नियुक्ती यासंदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या सूचना समजून घेतल्या. तसेच याविषयांवावत सविस्तर चर्चा करुन सर्व राजकीय पक्षांच्या सूचनांची नोंद घेऊन त्या अनुषंगाने कायद्यातील तरतूदी विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
0000
गजानन पाटील/ससं/