सिंधुदुर्ग, दिनांक 27 (जिमाका) :- सामान्य नागरिकाचं प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी ‘पालकमंत्री कक्ष’ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी आज मी ‘पालकमंत्री कक्षा’त उपलब्ध आहे. यापुढेही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा मी ‘पालकमंत्री कक्षा’त सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध राहणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘पालकमंत्री कक्षा’त जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर पोलिस अधिक्षक तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित असल्याने सामान्य नागरिकांच्या तक्रारी तात्काळ सुटण्यास मदत झाली.
‘पालकमंत्री कक्षा’त आपल्या समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील अनेक नागरिक आलेले होते. आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने काही वेळानंतर जिल्हा नियोजन सभागृहात तक्रारी स्विकारण्यात आल्या. अनेक तक्रारदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना थेट सूचना देत प्रश्न तात्काळ निकाली काढले.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, पालकमंत्री म्हणून मी जनतेच्या सेवेसाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस या कक्षामध्ये उपलब्ध राहणार असून त्याबाबत जनतेला वेळोवेळी कळविण्यात येणार आहे. जेणेकरुन नागरिक आपल्या समस्या घेऊन माझ्याकडे येतील आणि त्यांची प्रलंबित कामे मी पूर्ण करुन देईल. जनतेची कामे अधिक गतीमान पध्दतीने व्हावीत हा या पालकमंत्री कक्ष स्थापनेमागचा मुख्य उद्देश असल्याचेही ते म्हणाले.