आदिवासी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठ काम करत असल्याचे पाहुन प्रभावित झालो; विद्यापीठाला याकामी सहकार्य करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात वारसा आणि संशोधनाचा उत्सव

जळगाव दि.२८ (जिमाका वृत्तसेवा)- आ‍दिवासी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ज्या पध्दतीने काम करते आहे ते पाहून प्रभावित झालो असून याकामी विद्यापीठाला सहकार्य करत राहण्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “आदिवासी वारसा ओळख आणि अस्तित्वाचा उत्सव” (सेलिब्रेटींग ट्रायबल हेरीटेज फॉर इटस आयडेंटीटी ॲण्ड एक्झिस्टन्स) आणि “आदिवासी समुदायाच्या संशोधन पध्दती आणि तंत्रज्ञान”  या दोन विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे एकत्रित उद्घाटन करतांना डॉ.उईके बोलत होते.

अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी होते. विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या स्वामी विवेकांनद अध्ययन व संशोधन केंद्र, व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा तसेच आदिवासी अकादमी यांच्या वतीने या दोन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके म्हणाले की, आदिवासी समुदायाची संस्कृती वेगळी आहे. हा समाज प्रामाणिक, सन्मान करणारा आणि विश्वासू आहे. तो आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतो आहे. मात्र जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी हा समाज आपली संस्कृती विसरणारा नाही. ही संस्कृती संपुष्टात येणारी नाही. या समाजाच्या विकासासाठी कौशल्यविकासाची तसेच सुक्ष्म आणि लघु उद्योगाची गरज आहे. विद्यापीठाच्या नंदुरबार येथील आदिवासी अकादमीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या विविध प्रस्तावासाठी राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्यापर्यंत चर्चा करुन पाठपुरावा केला जाईल असेही डॉ.उईके म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी या विद्यापीठामार्फत केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची तसेच विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. प्रारंभी विवेकानंद संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा.अतुल बारेकर, आदिवासी अकादमीचे प्रभारी संचालक प्रा.के.एफ.पवार, तसेच व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालक प्रा.मधुलिका सोनवणे यांनी आयोजना मागील भूमिका सांगितली. यावेळी विद्यापीठाच्या वतीने सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिंनी सन्मान योजनेअंतर्गत ९ विद्यार्थिनींचा प्रा.उईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, नितिन झाल्टे, चैत्राम पवार, वैभव सुरंगे, प्रा.म.सु.पगारे, प्रा.मधुलिका सोनवणे, प्रा.के.एफ.पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.कविता सोनी व खेमराज पाटील यांनी केले.सामाजिक कार्यकर्ते किशोर काळकर यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

वैभव सुरंगे यांचे बीजभाषण

सामाजिक कार्यकर्ते वैभव सुरंगे यांनी आपल्या बीज भाषणात आदिवासी समुदायाच्या विविध संस्कृतीची माहिती दिली. आदिवासी समुदायाचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होत मात्र देशभर या समुदायाला ओळख मिळाली नाही. या समाजात महिला आणि पुरुषांना बरोबरीचा दर्जा आहे. मात्र या समाजाची ओळख चुकीच्या पद्धतीने मांडली गेली त्यामुळे देशभरातील संशोधकांनी नव्याने या समाजाचे संशोधन करावे. संशोधन करणाऱ्याची दृष्टी सकारात्मक असावी तसेच संशोधन पध्दती योग्य असायला हवी. त्यासाठी या समाजाची ताकद आणि ज्ञान जाणून घ्या. संशोधनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची अस्मिता समोर यायला हवी अशी अपेक्षा सुरंगे यांनी व्यक्त केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री चैत्राम पवार यांची मुलाखत प्रा. म.सु.पगारे व प्रा. मधुलिका सोनवणे यांनी घेतली. चैत्राम पवार यांनी जल, जंगल, जमीन, पशुधन यांच्या संवर्धन, संरक्षण यासाठी बारीपाडा आणि त्या भागात केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.