कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): आहारात तृणधान्यांचे अत्यंत महत्त्व आहे. तृणधान्यांचे उत्पादन वाढवून तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी जिल्ह्यात काजू बोर्ड प्रमाणेच “मिलेट बोर्ड” स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे मिलेट महोत्सव पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, कागल राधानगरी उपविभागाचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी (करवीर) अरुण भिंगारदेवे, नाचणी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. योगेश बन, तालुका कृषी अधिकारी रमेश गायकवाडी आदी उपस्थित होते. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेतील विजेत्या महिलांना पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच मिलेट रॅलीमध्ये पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. पाककला स्पर्धेत मिलेट पासून बनविण्यात आलेल्या पदार्थांची पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी चव चाखून पदार्थांचे कौतुक केले. तसेच या ठिकाणी लावण्यात आलेल्या विविध स्टॉल्सची पाहणी केली. राधानगरी कृषी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने देण्यात येणाऱ्या ड्रोन व्दारे फवारणी करण्यात येणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहून समाधान व्यक्त केले.
जिल्ह्याच्या अर्थकारणाला समृद्ध करण्यात शेती आणि शेतकरी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याचा विचार करुन शेतीसाठी पोषक वातावरण आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन देवून पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, सध्याच्या फास्ट फुडच्या जमान्यात वरई, नाचणीला आपण विसरत चाललो आहोत. परंतु आरोग्याच्या दृष्टीने तृणधान्यांचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या घरात तृणधान्यांपासून विविध पदार्थ बनवून कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या पदार्थांचा आहारात वापर वाढवावा. शेतकऱ्यांनी हेक्टारी 125 टन ऊस उत्पादन घेण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विविध भागातील वातावरणाचा विचार करुन त्यानुसार विविध पिके घेण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन द्यावे. नाचणी, वरई सारख्या तृणधान्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा. आहारातील मिलेटचे महत्त्व पटवून देण्यात मिलेट महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करून राज्याला दिशादर्शक ठरेल अशा भव्य कृषी महोत्सवाचे नियोजन करावे, असे त्यांनी सूचित केले.
शेती पिकांवर फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यामुळे कमी पाण्यात पूर्ण पिकांवर आधुनिक व समांतर पद्धतीने फवारणी केली जात आहे. यामुळे कमी कष्टात पैशाची व वेळेची बचत होत फवारणी होत आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा उपयोग करुन घेवून अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीवर भर द्यावा. यासाठी कृषी विभागाने प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी प्रास्ताविकातून मिलेट महोत्सवाची माहिती दिली. डॉ. योगेश बन यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक उपस्थित होते.
दरम्यान मिलेटचे महत्व पटवून देण्यासाठी तालुक्यातील विविध गावांमध्ये मिलेट बाईक रॅली काढण्यात आली, याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.