मुंबई दि. 28 : महिलांना आर्थिक साक्षरतेच्या सहाय्याने स्वावलंबी करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ सकारात्मक उपक्रम राबवित आहे. मविमने सशक्ती कॉन्क्लेव्हच्या (परिसंवाद) माध्यमातून 55,000 हून अधिक महिलांना सक्षम बनवण्यासाठी उद्योग उभारणीत सहकार्य केल्याचा आनंद महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
मास्टरकार्डच्या पाठिंब्याने आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन (LLF) द्वारे राबविण्यात आलेल्या सशक्ती कॉन्क्लेव्ह 2024-25 चे आयोजन नुकतेच नवी मुंबई येथे करण्यात आले होते.
यावेळी खासदार नारायण राणे, माविमच्या व्यवस्थापकीय संचालिका वर्षा लड्डा, लर्निंग लिग फाऊंडेशनच्या अध्यक्ष नुरीया अन्सारी, मार्स्टर कार्डचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक शरदचंद्रण संग्राम, पुनीत तळोजा यांच्यासह अनेक बचत गटांच्या महिला प्रातिनिधीक स्वरूपात उपस्थित होत्या.
या परिसंवादात महिलांशी संवाद साधतांना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांना शिक्षणाबरोबरच आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने प्रोत्साहित करण्यात येत आहेत. यासाठी राज्यातील जास्तीत जास्त महिलांना आर्थिक साक्षर करणे हे महत्वाचे उद्दिष्ट विभागाने डोळ्यासमोर ठेवले आहे. बचतगटांनी छोटे-मोठे उद्योग व्यवसायाबरोबरच मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी शासनस्तरावर महिलांना सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहेत. मोबाईलमुळे मोठी क्रांती झालेली आपल्याला पहावयास मिळते. मोबाईलसारख्या गॅझेटच्या माध्यमातून आर्थिक देवाण घेवाण करतांना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी महिलांना अशा परिसंवादाच्या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाण करतांना कशा प्रकारे आपण खबरदारी घेतली पाहिजे याविषयी परिसंवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
लघु उद्योगामुळे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत
देशात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महिलांनी छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू करून आर्थिक सक्षम होण्याचा निर्धार. यामुळे कुंटुबाला आर्थिक हातभार तर लागेलच परंतू निर्णय घेण्याचे स्वातंत्र देखील मिळणार आहे. महिलांनी सूरू केलेल्या उद्योग व्यसायामुळे देशाचे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासन सदैव महिलांच्या पाठीशी उभे असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
व्यवस्थापकीय संचालक वर्षा लड्डा म्हणाल्या की, माविम आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन (LLF) सारख्या स्वयंसेवी संस्थांमधील सहकार्यामुळे स्वयं-मदत गट (SHG) सक्षम होण्यासाठी मदत होत आहे. 2000 महिलांना एल एल एफ ने प्रशिक्षण देऊन, 200 महिलांना एलएलएफ-मास्टरकार्ड भागीदारी अंतर्गत अनुदान प्रदान केले. यामुळे यशस्वीरित्या त्यांचे व्यवसाय सुरू आहेत. हे खरोखरच प्रशंसनीय आहे.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/