नाशिक, दि. २९ –: प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, गुणवत्तापूर्व बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा व योग्य कृषी विषयक मार्गदर्शनातून शेतकऱ्यांची सेवा घडावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केले.
आज प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नाशिक रामेती येथे आयोजित राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज) हैदराबाद, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामती, नागपूर व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक पुरस्कृत कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र वितरण समारंभात कृषी मंत्री ॲड. कोकाटे बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले, निवृत्त परिवहन अधिकारी प्रकाश बनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा रामेतीचे प्राचार्य शिवाजीराव आमले, स्मार्ट प्रकल्प नाशिकचे विभागीय नोडल अधिकारी सुनील वानखेडे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, साहेबराव क्षीरसागर, अरूण आहेर यांच्यासह अधिकारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, 48 आठवडे कालवाधीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 80 प्रशिक्षणार्थीना कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील तांत्रिक कौशल्ये आणि व्यवस्थापन क्षमता आत्मसात झाली आहे. या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा पुरविण्यासह शेतीत येणाऱ्या विविध समस्या सोडविण्यास होणार आहे. यामुळे कमी खर्चात शेतकऱ्यांची शेतीतील उत्पादनक्षमता वाढीस चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होण्यास मदत होईल.
उत्पादन वाढीसाठी शेतीत प्रयोग करून नवीन वाण निर्माण करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये हॅकेथॉन स्पर्धा घेण्याचे नियोजन शासनस्तरावर सुरू आहे. येणाऱ्या काळात उत्कृष्ट कृषी सेवा देणाऱ्या कृषी सेवा केंद्रांची स्पर्धेतून निवड केली जाणार असून त्यांचाही शासनस्तरावर सन्मान केला जाणार आहे. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा विकासासाठी नवीन प्रयोग व योजना कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.
कृषी निविष्ठा विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहचावे तसेच शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा व्हावा, याउद्देशाने कृषी विषयांतील पदवीधर नसलेल्या कृषी निविष्ठा विक्री परवानाधारक विक्रेत्यांसाठी डिप्लोमा इन ॲग्रीकल्चर एक्सटेन्शन सर्विसेस फॉर इनपूट डिलर्स (DAESI)अभ्यासक्रम देश पातळीवर हैदराबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, (मॅनेज) या संस्थेने तयार केलेला आहे. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्यात वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन आणि विस्तार प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर या संस्थेमार्फत राबविला जात आहे. आठवड्यातील एक दिवस या अभ्यासक्रमाचे वर्ग घेण्यात येतात. त्यानंतर परीक्षा घेतली जाते. एकूण ४८ आठवडे कालावधी असलेल्या या पदविका अभ्यासक्रमामध्ये थेअरी क्लास, प्रात्यक्षिक तसेच क्षेत्रीय भेटी याचा समावेश आहे. किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना असलेल्या कृषी निविष्ठा .विक्रेत्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो. प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था रामेती नाशिक येथून एकूण 127 कृषी सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षित करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य श्री.आमले यांनी दिली.
यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष श्री. भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित तुकडी 3 व 4 च्या एकूण 80 प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
000000