रेडीओ क्लब जेट्टीबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय -विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मुंबई, दि.२९: गेट वे ऑफ इंडिया जवळील समुद्रात रेडीओ क्लब येथे जेट्टीचे बांधकाम करण्यात येत आहे. या जेट्टीबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेवऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले.

जेट्टी निर्माणामुळे येणाऱ्या अडचणी, शंका व होणारी गैरसोय, सूचना आदींबाबत विधान भवनातील कॅबिनेट कक्षात स्थानिकांसोबत बैठक घेण्यात आली. बैठकीत स्थानिक नागरिकांशी चर्चेदरम्यान अध्यक्ष ॲड. नार्वेकर बोलत होते. बैठकीस बंदरे मंत्री नितेश राणे, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, बंदरे विभागाचे उपसचिव हेमंत महाजन आदी उपस्थित होते.

अध्यक्ष ॲड.नार्वेकर म्हणाले, जेट्टीचे काम पुढील १० दिवस थांबविण्यात यावे. याबाबत स्थानिकांच्या आणखी एका बैठकीचे आयोजनही करण्यात येईल. त्यानंतर यामधून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. स्थानिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. जेट्टीसाठी पर्यायी जागेचा शोध घेऊन प्रकल्पाबाबत पडताळणी करावी. जेट्टीबाबत करण्यात आलेल्या विविध अभ्यासांचे अहवाल स्थानिक नागरिकांना देण्यात यावे. या अहवालांवरती त्यांच्या सूचना किंवा आक्षेप असल्यास त्याचीही पडताळणी करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

चर्चेवेळी मंत्री नितेश राणे म्हणाले, या प्रकल्पामुळे मुंबईहून अलिबाग, मांडवा, जेएनपीटी व एलिफंटा येथे जाण्यासाठी जलवाहतुकीची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. गेटवे येथील अस्तित्वातील जेट्टीवरील सुविधांवर मर्यादा येत असल्यामुळे प्रवाशांसाठी  अडचणी निर्माण होतात. या प्रस्तावित जेट्टीमुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

एवढा मोठा प्रकल्प होत असल्यास स्थानिकांच्या प्रतिक्रिया येणे स्वाभाविक असते. शासन जेट्टीचा प्रकल्प हा स्थानिकांवर लादणार नाही. प्रकल्पामुळे स्थानिकांची गैरसोय होत असल्यास किंवा मुंबईच्या हेरीटेजला धक्का बसेल, असे कुठलेही कार्य शासन करणार नाही. या जेट्टीबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल. मच्छीमारांच्या समस्यांचाही शासन गांभीर्याने विचार करेल. या प्रकल्पाबाबत करण्यात आलेले विविध अभ्यास अहवाल स्थानिकांना त्यांच्या परीक्षणासाठी देण्यात येतील.  जबरदस्तीने हा प्रकल्प पुढे रेटला जाणार नाही याबाबत मंत्री श्री.राणे यांनी स्थानिकांना आश्वासित केले.

याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी वाहतूक, गर्दीचे व्यवस्थापन, येणाऱ्या अडचणी याबाबत, मच्छीमार बांधवांनी मासेमारीबाबत  आपले विचार मांडले.

000000

नीलेश तायडे/विसंअ