केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती
नागपूर, दि. २९ – वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी निगडीत आजारांवर अधिकाधिक संशोधन करण्याची गरज आहे. उपचार पद्धती त्या दिशेने आखल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज केले.
मिहान परिसरात आयोजित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार श्यामकुमार बर्वे, एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, कार्यकारी संचालक डॉ . प्रशांत जोशी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून पूर्वी केवळ दिल्लीत असलेले एम्स आता तामिळनाडू, झारखंड या राज्यात तसेच नागपूरसह अनेक शहरात स्थापन झाले आहे. दिल्लीच्या एम्समध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच सहाय्यकांना निवासाची सोय मिळावी म्हणून शेल्टर हॉल सुद्धा निर्माण करण्यात आले आहेत. एम्स नागपूरच्या स्थापनेपासून सर्वात आधी पदवी घेऊन बाहेर पडलेली पहिली तुकडी म्हणून आपली या संस्थेच्या इतिहासात नोंद केली जाईल. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण कधीच थांबवू नये. त्यांनी या क्षेत्रातील नियतकालिकांचा अभ्यास करून यातील नव नवे संशोधन समजून घेत आपले ज्ञान अद्ययावत करावे असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर एम्समध्ये हृदय ,यकृत तसेच अवयव प्रत्यारोपणाबाबत आणि पूर्व विदर्भात प्रामुख्याने असणाऱ्या थॅलसेमिया, सिकलसेल या आजारावर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सारख्या शस्त्रक्रियांना देखील राज्य शासनाच्या योजनेतून एम्समध्ये सवलत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दीक्षांत समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. 2018 मध्ये एम्स नागपूरला मिहान येथे सुमारे 200 एकर जमीन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली.गेल्या 6 वर्षात एम्स नागपूरने आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आहे. येत्या काळातही ही संस्था वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
विद्यार्थ्यांना पदवीप्रदान
दीक्षांत समारंभात 2018 च्या तुकडीची विद्यार्थीनी डॉ. जिज्ञासा जिंदाल यांना अंतिम व्यावसायिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तसेच कम्युनिटी मेडिसिन आणि बालरोग शास्त्र विषयात सर्वात जास्त गुण मिळवल्याबद्दल डॉ. संजय पैठणकर सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. डॉ. अभिजित यांना द्वितीय तर डॉ . हिमांशू गजभिये यांना तृतीय क्रमांक प्राप्त केल्याप्रसंगी तसेच वेगवेगळ्या विषयात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुवर्णपदक आणि रोख पारितोषिक दिले गेले. यासोबतच 121 एमबीबीएस पदवीधारकांना आणि 24 पदव्युत्तर पदवीधारकांना पदवीप्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला एम्सचे शिक्षक, अधिकारी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते .
0000