वढू व तुळापूर बलीदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वढू येथे समाधी पूजन

पुणे, दि. २९ : छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे असून पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या वढू येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलीदान स्थळाला पर्यटन क्षेत्र नव्हे तर तीर्थक्षेत्राचाच दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथी निमित्त वढू बुद्रुक येथे समाधीस्थळी आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महंत रामगिरी महाराज, पुरुषोत्तम मोरे, माणिक मोरे, अक्षय महाराज भोसले तसेच वढू ग्रामपंचातीचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही साधू-संतांची, वीरांची भूमी आहे. छत्रपती संभाजी महाराज हे देव, देश आणि धर्मासाठी लढणारे राजे होते. त्यांच्या स्मृती स्थळाच्या विकासासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विकास कामे करताना पावित्र्य कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. दोन्ही स्थळांचा राज्याच्या लौकिकाला साजेसा  विकास करण्यात येईल. या कामाला गती देऊन दर्जेदार कामे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगून वढू व तुळापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाहीही श्री. शिंदे यांनी दिली.

ते म्हणाले,  राज्य शासन हे लोककल्याणकारी आहे. छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शावर चालणारे हे सरकार असून जनकल्याणाचा संकल्प शासनाने केला आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात अनेक विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबविल्या. तीर्थक्षेत्र, गडकोट किल्ले यांच्या विकासाला प्राधान्य दिले. गडकोट किल्ले हे आपले धरोहर आहेत. गडकोट किल्ल्यांवरील अतिक्रमण प्राधान्याने काढण्यात येईल. गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ते म्हणाले,  मुंबईतील सागरी मार्गाला धर्मरक्षक संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती गेट वे ऑफ इथे साजरी करण्यात आली, ही अभिमानाची बाब आहे.

वढू गाव हे महाराष्ट्राचे उर्जास्थान आहे. वढू हे स्वराज्य तीर्थ असून या स्वराज्य तीर्थाकडून मिळणारी शक्ती एकवटून महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जायचे आहे, असे सांगून गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. गोशाळेला अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आवश्यकता असल्यास गोहत्या रोखण्यासाठी आणखी कडक कायदा करण्यात येईल. गोरक्षकांचे काम करणाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले. तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार दरवर्षी आजच्या बलिदान दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महंत रामगिरी व आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी आपले विचार मांडले. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते महंत  रामगिरी महाराज यांना धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात धर्म रक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना शंभूसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते समाधीचे पूजन करण्यात आले. तसेच शासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाला ग्रामस्थ तसेच शंभुप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000