रमजान ईदनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जनतेला शुभेच्छा

प्रेम, आपुलकीने समाजात सौहार्द दृढ करूया

मुंबई, दि. ३०: राज्यात गुढीपाडव्या पाठोपाठ रमजान ईद हा सण उत्साहाने साजरा होत आहे. पवित्र अशा रमजान ईद सणाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटले की, मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना पवित्र मानला जातो. उपवासाच्या व्रतानंतर येणारा ‘ईद-उल-फित्र’ संयम, त्याग आणि समर्पण यांच्या कृतार्थतेची भावना निर्माण करतो. या दोन्ही सणांच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट होवून त्यांचे मनोरथ पूर्ण व्हावेत, अशी मनोकामना व्यक्त करतानाच त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ईद-उल-फित्र हा केवळ उत्सव नाही, तर आपल्या जीवनातील चांगल्या मुल्यांचा उत्सव आहे. या दिवशी आपण सर्वजण एकत्र येऊन, एकमेकांशी प्रेम आणि आपुलकीने समाजात सौहार्द दृढ करूया, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

०००