शिर्डी, दि.३१ – शिर्डी एमआयडीसीत होणाऱ्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या लौकिकात भर पडणार असून शिर्डी परिसराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून रोजगारात वाढ होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
सावळिविहीर खुर्द येथील शिर्डी औद्योगिक वसाहत येथे डिफेन्स क्लस्टरअंतर्गत निबे ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड (शेल फोर्जिंग) कंपनीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, निबे प्रायव्हेट लिमिटेडचे गणेश निबे, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड आदी उपस्थित होते.
श्री.विखे पाटील, शिर्डी एमआयडीसीमधील डिफेन्स क्लस्टरमुळे नवीन औद्योगिक पर्व सुरू होत आहे. शिर्डी विमानतळावरून नाइट लँडिंग सुविधा सुरू झाली आहे. यामुळे शिर्डीतील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. एमआयडीसीने डिफेन्स क्लस्टरसाठी मोफत जमीन उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी टाटा कंपनीच्या पुढाकाराने अडीचशे कोटींचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून यात उद्योगांना आवश्यक मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडील ३०० एकर जागा कोपरगाव औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.
शिर्डीचा विकास व औद्योगिक विस्तारासाठी ग्रामस्थांनी विचार विनिमय व समन्वयाने निर्णय घ्यावा. शिर्डी साईबाबा संस्थानच्या माध्यमातून ११ नंबर चारीच्या विस्तारासाठी २२ कोटी व थीम पार्कसाठी ४० कोटी मंजूर करण्यात आले आहेत, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेमुळे अनेक तरुण स्टार्टअप स्वरूपात कंपन्या स्थापन करत असून आर्थिक उन्नतीसाठी तरुणांनी जागतिकीकरणामुळे प्राप्त संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिर्डी एमआयडीसीमुळे आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे आमदार काळे यावेळी म्हणाले.
श्री.निबे म्हणाले, डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून पाच लाख बॉम्ब शेलची निर्मिती होणार असून या कंपनीच्या माध्यमातून तीन हजार रोजगार निर्माण होणार आहेत.
प्रास्ताविक मंगेश जोशी यांनी केले.
0000