सुंदर शाळा उपक्रमातून भौतिक सुविधांसह शाळांमध्ये गुणात्मक बदल – पालकमंत्री संजय राठोड

पालकमंत्र्यांच्याहस्ते शाळांना बक्षिस वितरण

Ø  ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रम

यवतमाळ, दि.३१ (जिमाका) :  तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सुरु करण्यात आला. शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण होण्यासोबतच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यांच्यात गुणात्मक बदल घडविण्यासाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत शाळांना बक्षिस वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॅा.प्रशांत गावंडे यांच्यासह पुरस्कार प्राप्त तालुक्यातील शाळांचे गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, खाजगी शाळा व्यवस्थापन संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळांनी चांगले काम केले आहे. या उपक्रमामुळे आदर्श शैक्षणिक वातावरण निर्माण होत आहे. शाळांना भौतिक सुविधा तर उपलब्ध होत आहेतच शिवाय गुणात्मक बदल यातून दिसतो आहे. शाळा केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत तर विद्यार्थ्यांना सर्वार्थाने घडविणारे ज्ञानाचे केंद्र आहे. त्यामुळेच खनिज विकास निधीतून जिल्ह्यातील शाळा मॅाडेल केल्या जात असल्याचे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.

शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी भविष्याची भावी पिढी आहे. या पिढीच्या व्यक्तिमत्व विकासासोबतच त्यांच्यात नैतिक मुल्यांची जोपासणा होणे देखील आवश्यक आहे. जिल्ह्यातील शाळांना आवश्यक्ता असल्यास डेस्क बेंच उपलब्ध करून देऊ. शैक्षणिक सुविधांसाठी जिल्हा परिषदेकडून येणाऱ्या प्रस्तावांना आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता येणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, प्राचार्य प्रशांत गावंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शाळांना पुरस्कार देण्यात आले. त्यात सन 2023-24 या वर्षातील स्थानिक स्वराज्य संस्था शाळा गटात प्रथम उच्च प्राथमिक शाळा नागापूर, ता.उमरखेड, द्वितीय उच्च प्राथमिक शाळा मनपूर, ता.यवतमाळ, तृतीय प्राथमिक शाळा चालबर्डी, ता.पांढरकवडा व उच्च प्राथमिक शाळा मजरा, ता. मारेगाव यांना देण्यात आला. खाजगी व्यवस्थापन शाळा गटात प्रथम माणिकराव पांडे पाटील विद्यालय फाळेगाव, ता.बाभुळगाव, द्वितीय मोहनाबाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, दिग्रस, तृतीय लखाजी महाराज हायस्कुल झाडगाव, ता.राळेगाव यांना देण्यात आला.

सन 2024-25 या वर्षातील स्थानिक स्वराज्य संस्था शाळा गटात प्रथम प्राथमिक शाळा सुकळी, ता.कळंब, द्वितीय उच्च प्राथमिक उर्दु शाळा मालखेड बु. ता.नेर, तृतीय उच्च प्राथमिक शाळा पिंपळापूर, ता.राळेगावचा समावेश आहे. खाजगी व्यवस्थापन शाळा गटात प्रथम महात्मा फुले विद्यालय उमरखेड, द्वितीय मातोश्री हायस्कुल महागाव तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस उटुंबू इंग्रजी शाळा जांब, यवतमाळ यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन कैलास राऊत यांनी केले. यावेळी पुरस्कार प्राप्त शाळांसह जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000