नागपूर,दि. ३१ : नव्याने उभारण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलातील स्पोर्टस हब, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे बारा मजली असलेले ट्वीन टॉवर्स हे केवळ बांधकामातील गुणवत्तेच्या दृष्टीनेच नव्हे तर सौर ऊर्जेच्या वापरासह ग्रीन बिल्डींग म्हणून नावारुपास आले पाहिजेत. यादृष्टीने इमारतीच्या बांधकामातील प्रत्येक टप्यांवर याचा विचार करुन काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात साकारणारे स्पोर्टस् हब व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारल्या जाणाऱ्या बारा मजली ट्वीन टॉवर्स आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या बांधकामाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या समवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, उपविभागीय अभियंता प्रशांत शंकरपूरे व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
नागपूर येथील लॉ विद्यापीठातील इमारतीच्या रचनेत आपण ऊर्जेबाबत स्वयंपूर्णता अंगिकारली. शाश्वत विकास व पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून विचार करता क्रीडा संकुल व आयुक्तालयाचे हे बांधकाम हे नेटझिरो अर्थात ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असले पाहिजे. या संकुलाला कार्यालयाला जी वीज लागेल ती वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण भागविण्यावर भर दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या सर्व इमारती ग्रीन बिल्डींगच्या सर्व मानकांची पुर्तता करुन पाण्याच्या पुर्नवापराच्या दृष्टीने आदर्श मापदंड ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सर्व इमारतींच्या उभारणीसाठी जो कालावधी निश्चित केला आहे त्या कालावधीच्या आत कोणत्याही परिस्थितीत बांधकाम पूर्ण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
*****