नागपूर, दि.३१ : शिव तांडव स्तोत्र हे शिवातील चांगल्या गुणांची स्तुती आहे. चांगल्या गुणांची स्तुती ही सकारात्मक ऊर्जा देण्यासह मनोबल उंचावण्याचे काम करते. जिथे कुठे अहंकारासारखी स्थिती निदर्शनास येते त्या अहंकाराला दूर करण्याचे मार्ग आध्यात्मात मिळतात. शिवतांडव स्तोत्राच्या अशा पठणासारख्या कार्यक्रमातून आपण सकारात्मक ऊर्जा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
कामठीतील श्री महादेव घाट परिसरात आज शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, माजी आमदार टेकचंद सावरकर, राजे मुधोजी भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याबद्दल कामठीतील शिवराज्य प्रतिष्ठानचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांच्या स्वसंरक्षणार्थ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यासोबतच शिव तांडव स्तोत्र पठण यासारख्या कार्यक्रमाच्या आयोजनातून आपला आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. शिव तांडव स्तोत्र पठण या अनोख्या उपक्रमाबद्दल कौतुकोदगार काढले तसेच येत्या काळातही अशा प्रकारचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
*******