ठाणे, दि. ०२ (जिमाका): ठाणे जिल्ह्यातील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात मौजे शिळ, सर्व्हे नं.97/1 व 17 या एमआयडीसीचा भूखंड तसेच शीळ, खर्डी, खान कंपाऊंड, महापे रोड या ठिकाणी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत विधानपरिषद सदस्य धीरज लिंगाडे व निरजंन डावखरे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.
यावेळी विधानपरिषद सदस्य धीरज लिंगाडे, निरंजन डावखरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळाचे कार्यकारी अभियंता आर.सी.राठोड, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, प्रादेशिक अधिकारी महेंद्र पटेल, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, ठाणे महानगरपालिका अभियंता श्री.जोशी, तहसिलदार उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, भूमी अभिलेख तसेच वनविभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रत्यक्ष संबधित टीटीसी औद्योगिक क्षेत्रात मौजे शिळ येथील सर्व्हे नं.97/1 व 97 या एमआयडीसीचा भूखंड तसेच शीळ, खर्डी, खान कंपाऊंड, महापे रोड येथील अनाधिकृत बांधकामबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमावेत चर्चा करून या संदर्भात असलेल्या तक्रारींबाबत कोणत्या कायदेशीर उपाययोजना करता येतील, याबाबत आढावा घेतला.
यावेळी मंत्री नाईक म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळ, महसूल, वन विभाग, महानगरपालिका, भूमी अभिलेख यांनी एकत्रितपणे अनधिकृत बांधकामाबाबत लवकरात लवकर प्रत्यक्ष जागेची मोजणी करुन, हद्द कायम करुन अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम होवू नये, असे माझे मत आहे. परंतु, उद्योगाचा प्रश्न असेल तर मी त्याबाबत काही निर्णय घेवू शकतो मात्र, इतर विषयाबाबत निर्णय संबधित विभागास सोबत घेऊन घ्यावा लागेल. या संदर्भात संबधित विभागाकडून कायदेशीर अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
०००