यवतमाळ, दि. 3 (जिमाका) : मृद व जलसंधारण विभागाच्या उद्योग भवन येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन आज मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते झाले.
यावेळी पालकमंत्र्यांह मृद व जलसंधारण विभागाचे नागपुर येथील मुख्य अभियंता वसंतराव गालफाडे, अमरावती येथील अधिक्षक अभियंता श्री.निपाने, जिल्हा जलसंधारण अधिकारी भुपेश दमाहे, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पांडे यांच्यासह विभागाचे सर्व उपविभागीय जलसंधारण अधिकारी, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
फित कापून कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्री श्री.राठोड यांनी संपुर्ण कार्यालयाची पाहणी केली. अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यालयाची मांडणी केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान केले. मृद व जलसंधारण विभागाचा मंत्री व राज्यमंत्री दोघेही यवतमाळ जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे विभागाची शहरात स्वतंत्र चांगली ईमारत उभी राहू शकेल का? याबाबत तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यासाठी लागणार निधी उपलब्ध करून देऊ असे ते म्हणाले.
जिल्ह्यात मृद व जलसंधारणाची अनेक कामे सुरु आहे. या आर्थिक वर्षात जास्तीत जास्त कामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कामांसाठी लागणार निधी देण्यात येतील, असे ते म्हणाले. विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध कामांबाबत यावेळी त्यांनी चर्चादेखील केली.