आंतरराष्ट्रीय ‘पीडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025’ विजेत्या भारतीय  दिव्यांग क्रिकेट संघाचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अभिनंदन

दिव्यांग क्रिकेट संघाच्या प्रगतीसाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करणार

मुंबई, ५ :  क्रीडा व युवक कल्याण मंत्री  दत्तात्रय भरणे यांनी कोलंबो, श्रीलंका येथे झालेल्या पीडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकणाऱ्या भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे अभिनंदन केले असून दिव्यांग क्रिकेटच्या प्रगतीसाठी शासनातर्फे आवश्यक सर्व मदत आणि सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद मिळवले. या भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाच्या खेळाडूंचा सत्कार नुकताच मंत्रालयात करण्यात आला.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संघातील खेळाडूंच्या जिद्दीचे, क्रिकेटप्रति असलेल्या उत्कट प्रेमाचे आणि कठीण परिस्थितीतही उभे राहण्याच्या जिगरबाज वृत्तीचे कौतुक केले. या स्पर्धेतील विजय हा भारतीय दिव्यांग खेळाडूंसाठी एक ऐतिहासिक टप्पा असून, अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या विजयी संघाचे नेतृत्व कर्णधार विक्रांत केणी यांनी केले, तर उपकर्णधार रवींद्र संते होते. संघातील प्रमुख खेळाडूंमध्ये अष्टपैलू खेळाडू आकाश पाटील आणि फलंदाज कुणाल फानसे यांचा समावेश होता. या अभिनंदन समारंभास कल्पेश पुंडलिक गायकर, (डीसीसीआय समिती सदस्य), विश्वनाथ गुरव, (अध्यक्ष, व्हीलचेअर स्पोर्ट्स असोसिएशन), राहुल रामुगडे, (कर्णधार, मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघ) , प्रशांत विष्णू नेरपगारे, (पॅरा शूटर आणि व्हीलचेअर बास्केटबॉल खेळाडू. ) उपस्थित होते.