‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’च्या तयारीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

सातारा दि.4: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे.  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या पर्यटन महोत्सवाच्या तयारीचा आढावा पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.

सातारा जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात पर्यटन महोत्सव होत आहे. या महोत्सवात पर्यटकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये लेसर शो, स्वरोत्सव, साहसी उपक्रम, फुड फेस्ट आणि आनंदयात्रा, लहान मुलांसाठी विविध खेळ, कार्निवल परेड, उत्सव महाराष्ट्राचा समृध्द परंपरेचा, किल्ला प्रदर्शन,  शस्त्र प्रदर्शन, साहसी व मर्दानी खेळ, टेंटसिटी, ड्रोन शो, योग, वाद्यसंगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, बोट प्रदर्शन आदी सर्व कायक्रमाच्या अनुषंगाने तयारीबाबत बैठकीत चर्चा झाली.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, महोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत  विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता विद्यूत विभागाने घ्यावी.  नगरपालीका प्रशासनाने स्वच्छतेबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.  कार्यक्रमांवेळी अग्नीशमन यंत्रणा तैनात ठेवावी.  तसेच कार्यक्रमांच्या ठिकाणी आवश्यक पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, आरोग्य विभागाने ॲम्ब्युलन्स उपलब्ध ठेवाव्यात.  पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत राहण्याबरोबरच गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवावा.  महोत्सव पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने सुरुर वाई रस्त्या बरोबर इतर रस्त्यांची सुरु असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.  महाबळेश्वर नगरपालीका हद्दीत सुरु असलेली विकास कामे, अवकाळी पावसाची शक्यता आदींबाबत चर्चा करण्यात आली.