शेतकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांकडून विकासकामांची पाहणी

बारामती, दि. ०६: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्रात शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा, या सुविधांचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होईल यादृष्टीने कामे करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी शहरातील रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्र, शारदा प्रागंण शाळा, वसंतराव पवार नाट्यगृह, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ विश्रामगृह येथील विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.

यावेळी प्रादेशिक रेशीम सहायक संचालक कविता देशपांडे, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,जिल्हा रेशीम अधिकारी संजय फुले, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी पंकज भुसे आदी उपस्थित होते.

वसंतराव नाट्यगृह परिसरातील नागरिकांची वर्दळ लक्षात घेता  सुरक्षिततेच्यादृष्टीने विद्युत रोहित्र आणि संरक्षक भिंतीचे कामे करावीत. परिसरातील बैठक व्यवस्था, पायऱ्या, वाहनतळ तसेच ज्येष्ठ नागरिक, लहान बालके यांचा विचार करुन फरशा बसवाव्यात.

शारदा प्रागंण शाळेचे काम करतांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या नियमांचे पालन करावे.  विद्यार्थ्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विचार करण्यात यावा.

एमआयडीसी विश्रामगृहाच्या दर्शनी भागात विभागाचा लोगो लावावा. लाकडी साहित्याला वाळवी प्रतिबंधक कीटकनाशकाचा वापर करण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून ही सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पाहणीप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

०००