मुंबई, दि.०५: जागतिक आरोग्य दिनानिमित्त उद्या ७ रोजी महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा – २०२५ व विविध आरोग्य सेवा योजनांचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट मुंबई येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती, प्रा. राम शिंदे, कौशल्य रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवाचे आयुक्त तथा मुंबई राष्ट्रीय अभियानाचे संचालक अमगोथ रंगा नायक, राज्य कामगार विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण, मुंबई आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
‘आरोग्यदायी सुरुवात, आशादायी भविष्य’ या जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषवाक्यानुसार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून राज्यातील जनतेला अधिक पारदर्शक, जलद, सक्षम आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे त्यादृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभाग नवीन आरोग्य सेवा योजनांचा शुभारंभ करत आहे. यावेळी आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्र आरोग्य सन्मान व पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे.
खालील आरोग्य सेवा योजनांचा होणार शुभारंभ…
- e-Sushrut (HMIS System) संकेतस्थळाचे विस्तारीकरण शुभारंभ.
- महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी प्रणालीचे (Bombay Nursing Home Act) ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण शुभारंभ.
- राज्यातील 6 जिल्ह्यांत 6 आरोग्य संस्थांमध्ये डायलिसीस युनिटचा शुभारंभ.
- राज्यातील आरोग्य संस्थांच्या बांधकामाच्या ऑनलाईन संनियंत्रण व पाठपुरावा सॉफ्टवेअरचे उद्घाटन.
- गर्भाशयमुख कर्करोग जनजागृती (9 ते 14 वर्षे वयोगट) अभियान – कर्करोगासंबंधी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावी अंमलबजावणी.
- महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ – आता कामगारांसहित सर्वसामान्य जनतेसाठीही खुली.
- महाराष्ट्र राज्यात सीपीआर प्रशिक्षणाचे उद्घाटन व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण.
- आरोग्य सेवा निरीक्षण प्रणालीचा शुभारंभ.
- महाराष्ट्र आरोग्य सन्मान 2025 पारितोषिक वितरण आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आरोग्य संस्थांचा सन्मान.
०००