नंदुरबार, दि. ०७ (जिमाका): ‘आपली अभ्यासिका’ उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वाचन संस्कृतीला चालना मिळणार आहे. तसेच पोलीस विभागाच्या ई-स्मार्ट बिट सिस्टममुळे स्मार्ट पोलिसिंग बरोबर कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत आपली अभ्यासिका, ई-स्मार्ट बिट उपक्रमांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार ॲड. गोवाल पाडवी, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी आमदार सर्वश्री आमशा पाडवी, राजेश पाडवी, शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) गोविंदा दाणेज यांच्यासह विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, ग्रामीण भागात अभ्यासिका निर्माण करण्याची गरज असून त्या माध्यमातून वाचन संस्कृती रूजवण्याबरोबरच विविध लोकोपयोगी माहिती या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अशा अभ्यासिकांमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या गरीब, होतकरू युवक आणि विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. ‘ई-स्मार्ट बिट’ सारख्या पोलीस यंत्रणेचे सनियंत्रण करणाऱ्या उपक्रमातून जिल्ह्यातील संवेदनशील बिंदूवर लक्ष केंद्रीत करून कायदा व सुव्यवस्था अधिक सतर्क व सक्रीय करण्यास मदत मिळणार आहे. येत्या काळात पोलीस दलाला बळकटी देण्यासाठी नंदुरबार, शहादा, नवापूर या शहरांमध्ये सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाईल. त्यापाठोपाठ संपूर्ण जिल्हा पोलीस दलाच्या सीसीटीव्ही नियंत्रणाखाली आणला जाईल.
परिवहन विभागाने नंदुरबार शहरातील शासकीय रुग्णालयात तसेच शासकीय कार्यालयांना नागरिकांना प्रवास करणे सुलभ व्हावे, यासाठी तात्काळ इलेक्ट्रिक मिनी बसेस सुरू कराव्यात. त्यासाठी असा प्रकल्प यशस्वी करणाऱ्या नागपूर मनपा आयुक्तांशी चर्चा करावी. तोरणमाळ सारख्या दुर्गम थंड हवेच्या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी तेथेही मिनी बस सुरू करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. त्यासाठी आवश्यकता भासल्यास जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांना प्रोत्साहित करावे. शेतकऱ्यांना विविध साधने, औजारे लागतात ती प्रमाणित व दर्जेदार उपलब्ध व्हावीत, यासाठी औजारे उत्पादक कंपन्यांचे इनपॅनलमेंट करण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी केल्या. आमसूल प्रोसेसिंग साठी बारीपाडा येथील पद्मश्री चैतराम पवार यांनी सोलर यंत्रणेवर चालणारे व अत्यल्प किमतीचे प्रोसेसिंग युनिट तयार केले असून त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. नवापूर व भालेर औद्योगिक वसहतींमध्ये उद्योगांना चालना देण्यासाठी तेथे रस्ते, विज व पाणी यासारख्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर द्यावा. नवापूर सारख्या औद्योगिक वसाहतींमध्ये गुजरातसारख्या राज्यातून उद्योग महाराष्ट्रात येत आहेत, तेथील विजेची समस्या सोडवल्यास शंभराहून अधिक उद्योग तेथे येण्यास तयार आहेत. औद्योगिक वसाहतींमधील विजेच्या समस्येचे तात्काळ निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी दिले आहेत.
वन विभागाने लोकप्रतिनिधींनी व्यापक जनहिताच्या दृष्टीने सुचवलेले कामांवर तात्काळ कार्यवाही करावी. तसेच त्यांनी मागितलेली माहिती तात्काळ उपलब्ध करून द्यावी. वन विभागाच्या कामकाजाच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्यांवर लवकरच वनमंत्री यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेण्यात येईल, असेही पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.
दृष्टिक्षेपात आढावा…
- 📚 ‘आपली अभ्यासिका’ उपक्रमातून ग्रामीण वाचन संस्कृतीला चालना.
- 👮♂️ ‘ई-स्मार्ट बिट’ मुळे पोलिसिंग अधिक स्मार्ट व कार्यक्षम.
- 📷 नंदुरबार, शहादा, नवापूर शहरांमध्ये सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करणार.
- 🚌 इलेक्ट्रिक मिनी बस नंदुरबार शहर व तोरणमाळमध्ये सुरू करण्याचे निर्देश.
- 🌾 फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना प्रोत्साहन, दर्जेदार कृषी औजार उपलब्धतेवर भर.
- ☀️ सौर ऊर्जेवर आधारित आमसूल प्रोसेसिंग युनिट राबवण्याचा प्रस्ताव.
- 🏭 औद्योगिक वसाहतींसाठी वीज, पाणी, रस्ते अशा सुविधांवर भर.
- 🌲 वन विभागाने लोकप्रतिनिधींच्या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करावी.
०००