लातूर, दि. ०७ : सहकारी संस्थांचे बळकटीकरण करून सहकार चळवळ गतिमान करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. अहमदपूर येथील सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अहमदपूर येथील प्रशासकीय इमारतीत स्थलांतरीत झालेल्या सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे मंत्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संगमेश्वर बदनाळे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांनी नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देऊन संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मंत्री पाटील म्हणाले. राज्यातील अनेक विकास सेवा सोसायट्या दुकाने, सभागृहे उभारून संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवत आहेत. या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील कार्यकारी सेवा सोसायट्यांनीही ग्रामीण भागातील नागरिक, शेतकऱ्यांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाने विविध सहकारी संस्थांना योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
०००