पालकमंत्र्यांनी घेतला पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा आढावा

‘त्या’ १४ गावांना खडकपूर्णाचे पाणी मिळणार

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

बुलढाणा, दि. ८ : जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा मंगळवारी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात झालेल्या या प्रशासकीय विभागांच्या आढावा बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचेसह उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी या बैठकीत जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान, सिंचन प्रकल्पातील  पाणीसाठा, पाणी टंचाई निवारनार्थ कृती आराखडा, जनावरांसाठी चारापाणी, विहीर अधिग्रहण, जलसंधारणाचे काम, सिमेंट बंधारे बांधकाम, भूजल पाणी पातळी, राष्ट्रीय पेयजल योजना, टॅंकरने पाणी पुरवठा, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, नळ जोडणी, हर घर जल, जलजीवन मिशन, खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी धोत्रा नंदई व इतर १४ गावांना पाणी उपलब्ध करणे यासह विविध विषयांचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठ्याचे नियोजन करावे, पिण्याचे पाणी नियोजनावर विशेष लक्ष द्यावे, दरवर्षी टंचाई असलेल्या गावांना जलसंधारणाच्या कामांमध्ये प्राधान्य द्यावे, टॅंकर सुरुअसलेल्या गावांमध्ये बोअरवेलचे काम काम पूर्ण करावे. पाणी पुरवठा योजना ताबडतोब पूर्ण कराव्यात. जलजीवन मिशनच्या कामांचा दर्जा राखला जाईल याची दक्षता घ्यावी. या कामांची नियमित तपासणी करावी. जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध करुन द्यावा, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करावी, असे निर्देश पालकमंत्री ना.पाटील यांनी प्रशासनाला दिले.

‘त्या’ १४ गावांना पाणी मिळणार

राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी २४ मार्च रोजी आत्महत्या केली होती. या घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेत त्यानुषंगाने पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी धोत्रा नंदई व इतर १४ गावांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात अंढेरा, वाकी बु, वाकी खु, सेवानगर, पिंप्री आंधळे, शिवनी अरमाळ, नागणगाव, पाडळी शिंदे, मेंडगाव, बायगाव, सावखेड नागरे, वाघाळा आणि खैरव या गावांना खडकपूर्णाचे १६६० हे सिंचन क्षेत्रासाठीचे पाणी देण्याचा ७० कोटींचा प्रस्ताव नियामक मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळवून १४ गावांना पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री ना.पाटील यांनी यावेळी सांगितले.

कै. कैलास नागरे यांच्या आत्महत्येला बलिदानाचा दर्जा देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असून या मागणीविषयी त्यांना माहिती देणार आहे.  कै. नागरे यांच्या वारसांचे पालकत्व शासनाने  स्विकारले आहे. तसेच त्यांच्या पत्नीला नौकरी देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असेही  पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांनी हा पाणी प्रश्न सोडवल्याबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी, गावकरी यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी पाणी टंचाई निवारनार्थ उपाययोजनाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

००००