पत्रकारांचे आयुष्य सुकर करण्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन पुरकार वितरण सोहळा

मुंबई, दि. ०८: पत्रकारांना बातम्या मिळविताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. पहिली बातमी आपली असावी, या स्पर्धेमुळे पत्रकारांची बातमी मिळविण्याची धडपड अनेकवेळा निदर्शनास येते. पत्रकार कुटुंबासाठी वेळ न देता आपल्या करिअरला वाहून घेत आपल्या कर्तव्याला न्याय देतात.  पत्रकारांचे हे धडपडणारे आयुष्य सुकर करण्यासाठी  शासन सातत्यपूर्ण काम करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

अण्णाभाऊ साठे सभागृहात टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार प्रसाद लाड, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव, महासचिव पंकज दळवी, खजिनदार प्रवीण पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रामध्ये महिला पत्रकारांचे विशेषत्वाने कौतुक करावेसे वाटते. बातमी मिळविताना त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. बऱ्याच ठिकाणी कुठलेही मूलभूत सुविधा नसतानाही महिला पत्रकार आपले काम अचूकतेने बजावीत असतात. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध असून पत्रकारांना सोबत घेऊन ते सोडवण्याबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल.

टीव्ही जन्मालिस्ट असोसिएशनचा हा  पहिलाच पुरस्कार सोहळा असल्याचे सांगत या सोहळ्याला उपस्थित राहता आले, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. या पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले. पत्रकारिता क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल हा त्यांचा गौरव होता. पुरस्कार हा आपल्या क्षेत्रातील कामाचे मूल्यमापन असते. त्यामुळे असोसिएशन सुरू केलेले पुरस्कार कौतुकास्पद आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट पत्रकार, कॅमेरामॅन, वृत्त निवेदक, ग्रामीण भागातील पत्रकार, कॅमेरामॅन, जीवनगौरव पुरस्कार आदींचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला बहुसंख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.

०००