प्रगतीचे मार्ग: दुबई – भारत आर्थिक भागीदारी व्यावसायिक परिसंवाद

दुबईचे उपपंतप्रधान राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतुम आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची उपस्थिती

मुंबई, दि. ०८ : दुबई वाणिज्य व उद्योग मंडळे आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय), फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एफआयसीसीआय) आणि आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या सहयोगाने दुबईचे उपपंतप्रधान राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतुम आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थित  ‘प्रगतीचे मार्ग: दुबई – भारत आर्थिक भागीदारी’ या व्यावसायिक परिसंवादाचे आयोजन आज करण्यात आले होते.

यावेळी दुबई चेंबर्सचे अध्यक्ष सुलतान बिन सईद अल मन्सुरी, डीपी वर्ल्डचे चेअरमन आणि सीईओ तसेच दुबई इंटरनॅशनल चेंबरचे चेअरमन सुलतान अहमद बिन सुलेयम आणि  त्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

या परिसंवाद मध्ये दुबई आणि भारत यांच्यातील डिजिटल इकॉनॉमी मार्गाचा आरंभ होत असल्याचे घोषित करण्यात आले. या भागीदारीचा एक नवीन टप्पा म्हणून बंगळुरूमध्ये दुबई चेंबर्सचे नवीन कार्यालय उघडण्यात येणार आहे. हे कार्यालय भारतातील डिजिटल क्षेत्रातील सहकार्याचा प्रवेशद्वार ठरेल, असे सांगण्यात आले.

या परिसंवादात करण्यात आलेल्या घोषणा

  • ‘भारत पार्क’च्या बांधकामाला आजपासून सुरुवात झाली आहे. याचा पहिला टप्पा २०२६ च्या अखेरीस पूर्ण होईल. हे पार्क भारतीय उत्पादने जागतिक खरेदीदारांसाठी एक मंच म्हणून काम करेल,विशेषतः जीसीसी देश आणि आफ्रिकेतील खरेदीदारांसाठी.
  • ‘भारत आफ्रिका सेतू’या उपक्रमाचा शुभारंभ या माध्यमातून भारत आणि आफ्रिका दरम्यान समुद्री आणि हवाई संपर्क, आणि डीपी वर्ल्डच्या लॉजिस्टिक पार्क्सच्या साहाय्याने व्यापार अधिक मजबूत होईल. भारतातील निर्यातदारांना आफ्रिकेतील ५३ देशांमध्ये व्यापारासाठी मोठे नेटवर्क आणि पायाभूत सुविधा मिळतील.
  • डीपी वर्ल्ड आणिRITESलिमिटेड यांच्यात सामंजस्य करार. या कराराच्या अंतर्गत, दोन्ही संस्था जागतिक प्रकल्प विकसित करण्याच्या संधी शोधतील. व्हर्च्युअल ट्रेड कॉरिडॉर प्लॅटफॉर्म एकत्र सुलभ सान्निध्य देईल जे कस्टम्स आणि लॉजिस्टिक्स प्रक्रियांना एकत्र आणेल. डीपी वर्ल्ड आणि कोचीन शिपयार्ड यांच्यात सामंजस्य करार. या सहकार्यामुळे शिप रिपेयर, शिप कन्स्ट्रक्शन, ऑफशोअर फॅब्रिकेशन, ऑइल व गॅस यामध्ये सहकार्य वाढेल. ‘मेक इन इंडिया २०३०’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांना गती मिळेल.
  • डीप-वॉटर पोर्टवरील कंटेनर टर्मिनलचे पूर्ण बांधकाम २०२७ पर्यंत पूर्ण होईल. हे पोर्ट भारत सरकारच्या ग्रीन पोर्ट गाइडलाइन्सनुसार तयार केले जात आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री गोयल परिसंवादामध्ये मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मुंबई आणि दुबई यांच्यात केवळ क्रिकेटच नव्हे, तर अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. यंदा आपल्या कुटुंबाच्या भारतभेटीच्या १०० वर्षांचं स्मरणीय वर्ष आहे — शेख सईद यांच्या १९२४ मधील भेटीला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत.

भारत आणि युएई यांचे नाते हे केवळ व्यापारी संबंध नसून, विश्वासावर उभं असलेलं एक भागीदारीचं आदर्श उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएईतील सर्व प्रमुख नेत्यांमधील विश्वासाचं मूर्त स्वरूप आहे.

युएईमध्ये उभ्या राहत असलेल्या स्वामीनारायण मंदिराबद्दलही आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोत.

शिक्षण क्षेत्रातील वाढती भागीदारी — दुबईत आयआयटी सुरू झालं आहे, आता आयआयएम येत आहे, आणि लवकरच आयआयएफटीही सुरू होईल. ही केवळ सुरुवात आहे. शिक्षण, व्यापार, संस्कृती, ऊर्जा, लॉजिस्टिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा, अन्न सुरक्षा, आणि आणखी अनेक क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत.

भारताची जीडीपी दुपटीने वाढली आहे. २०२५ अखेर भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, आणि २०२७ पर्यंत तिसरी बनेल. यामुळे ‘विकसित भारत’चं स्वप्न आणि युएईचं ५० वर्षांचं व्हिजन हातात हात घालून पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

गजानन पाटील/ससं/