मुंबई, दि. ०८: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व समाजघटकांनी सहभाग घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.
समता पर्व सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर सर्व शासकीय वसतिगृह, सर्व दिव्यांग शाळा व समाज कल्याण विभागांर्तगत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये व्याख्यान, रक्तदान शिबिर, विविध उपक्रमांच्या अनुषंगाने कार्यशाळा, विविध प्रबोधनपर कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिक व महिला मेळावा आदी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यात सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
सामाजिक समता सप्ताहात हे उपक्रम राबविले जाणार
➡️दि. ९ एप्रिल, २०२५ रोजी विभागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचांरावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन.
➡️दि. १० एप्रिल, २०२५ रोजी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये पथनाट्य व लघुनाटिका या द्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन.
➡️दि. ११ एप्रिल, २०२५ रोजी क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार.
➡️ दि. १२ एप्रिल, २०२५ संविधान जागर भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती देण्यात येत आहे तसेच संविधानाची निर्मिती, संविधान निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषतः मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान.
➡️ दि. १३ एप्रिल, २०२५ रोजी प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर व ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात येत असून, जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार .
➡️ दि. १४ एप्रिल, २०२५ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन व इतर कार्यक्रम, व्याख्याने, चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी विभागातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात ऑनलाईन जातपडताळणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत.
०००
शैलजा पाटील/विसंअ/