पुणे, दि. ०९: कृषी विभागातील प्रयोगशील अधिकारी, निवृत्त अधिकारी, प्रयोगशील शेतकऱ्यांचे ज्ञान, विद्यापीठातील ज्ञान तसेच परदेशातून आलेले ज्ञान, पिकांचे वाण लोकाभिमुख कसे करता येतील या दृष्टीकोनातून आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतीमध्ये शासकीय खर्चाने भांडवली गूंतवणूक करुन शेती उत्पादनात कशी आणता येईल, याबाबत विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.
शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित राज्यस्तरीय कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदवले, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक विनायक कोकरे, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ आदी उपस्थित होते.
समाजात गुणवत्तेला महत्त्व देणारा एक वर्ग आहे, असे सांगून मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, आरोग्याविषयी जागरुक असलेला वर्ग समाजात असून अन्न कितीही महाग असले तरी विकत घेणारा आहे. उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणे म्हणजे स्वयंपूर्ण झालो असे नाही. उत्पादनाची गुणवत्ता राखली जाणे, व्यवस्थित त्याची जाहिरात होणे, बाजारपेठ मिळणे आणि त्याला बाजारभाव मिळणे ही मूल्यसाखळी आपल्याला निर्माण करायची आहे.
हवामान बदलामुळे शेतीपुढे खूप आव्हाने आहेत. एका क्षणात प्रचंड नुकसान होते. अशा परिस्थितीत शासन म्हणून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणे, आपला विचार अभ्यास, प्रत्यक्षात आणणे त्यातून शेतकऱ्याला ज्ञान देणे ही खरी काळाची गरज आहे. बदलत्या काळात शेतीला कशी सुरक्षा देऊ शकतो, खर्च कसा कमी करू शकतो. उत्पादन चांगल्या प्रतीचे कसे घेऊ शकतो. त्याला उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या सुविधा राज्यशासन कुठल्या प्रकारे देऊन त्याच्या पाठिशी उभे राहू शकते या दृष्टीने या कार्यशाळेत चर्चा व्हावी.
अनेक शेतकरी शिक्षित नसले तरी प्रयोगशील असल्यामुळे, तंत्रज्ञानाची ओढ असल्याने, नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता असल्यामुळे शेतामध्ये बदल करणारे आहेत. आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे नवनवे तंत्रज्ञान येत आहे. हे ज्ञान काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत प्रत्यक्ष सुरू केले आहे. परंतु, या ज्ञानाला खात्री आणि संरक्षण देऊन शेतकऱ्यांच्या मागे आश्वासकपणे उभे राहण्याचे काम शासनाला करायचे आहे.
कृषी हॅकेथॉन आयोजित करून शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून या माध्यमातून प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण करण्यात येणार आहे. केवळ कृषी विद्यापीठांवर अवलंबून न राहता शेतीमध्ये, उत्पादनामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले, तंत्रज्ञान विकसित केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून नवकल्पना घेणे, तंत्रज्ञान लोकाभिमुख करणे हा यामागील उद्देश आहे.
शेतकऱ्यांसाठी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केले पाहिजे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही. विभागाने कृषी सहायकांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च तंत्रज्ञानाने ज्ञानी, हुशार आणि कार्यक्षम असा कर्मचारी वर्ग कसा राहील, असा प्रयत्न आहे, असेही कृषी मंत्री म्हणाले.
मोठ्या शहरात अनेक मोठ-मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाची तात्काळ विक्री होऊ शकते. फक्त त्याची जोडणी झाली पाहिजे, त्यासाठी समन्वय साधण्याचे काम करावे लागणार आहे, असेही कृषी मंत्री म्हणाले.
राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले की, आत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्यासाठी, राज्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीची गती वाढविण्यासाठी आपण किती समर्पण भावनेने काम करतो यावर महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे भविष्य अवलंबून आहे. दिलेल्या जबाबदारीचे माणसाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर जगामध्ये भारत महाशक्ती होण्यास मागे राहणार नाही. विभागाच्या दिवसभराच्या कार्यशाळेतील मंथनातून निघणाऱ्या विचारांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करणे खूप महत्त्वाचे आहे.
अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून जे शिकायला मिळते त्या सर्व बाबींचा प्रतिसाद, माहिती वरिष्ठ पातळीवर पोहोचविल्यास महाराष्ट्राच्या हितासाठी जे अधिक आवश्यक असेल ते निश्चितपणे करण्यात येईल. शासनाने कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करायची असे ठरवले असून त्यातून शेतकरी आपल्या पायावर कसा उभा कसा राहील हे प्रयत्न राहणार आहेत. कृषी विभागाने आपले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करायचे आहेच परंतु, त्याची कालबद्ध अंमलबजावणी होणेही गरजेचे आहे. आपल्याला विकेल ते पिकेल हा दृष्टीकोन ठेवून शेतीमध्ये काम करायचे आहे, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात सूरज मांढरे म्हणाले, या कार्यशाळेत शेतकऱ्यातील शेतकरी, विक्रेता, खरेदीदार आदी पैलूंवर चर्चा करण्यायसह कृषी विभाग, शेतकऱ्यांच्या समोरील प्रश्नावर विचारमंथन करून उपाययोजना सादर करणे आणि दिशा ठरविण्यात येणार आहे. आज देशाचे कृषी उत्पादन वाढले मात्र, ग्राहक अन्नाच्या गुणवत्तेबाबत संभ्रमित आहे. व्यक्तिगत शेतकऱ्याची खरेदी क्षमता विखुरल्यामुळे खर्च वाढलं आहे. आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या वेगाने पुढे येत आहे. आदींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यशाळेला राज्यभरातून कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी ते कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संस्थापक, शेतकरी गटांचे सदस्य, प्रयोगशील शेतकरी आदी उपस्थित होते.
०००