रायगड, दि. ०९ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 12 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेतली. या संदर्भातील काटेकोर नियोजनाच्या सूचना त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.
महाड शासकीय विश्राम गृहात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महाडचे प्रभारी प्रांताधिकारी संदीपान सानप, तहसीलदार महेश शितोळे गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील यांच्यासह केंद्रीय पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग, महावितरण, पंचायत समिती, पोलीस दल, महसूल विभाग, राज्य परिवहन, पशुवैद्यकीय विभाग, आरटीओ,रायगड रोपवे प्रशासन,आरोग्य विभाग, नगरपरिषद प्रशासन,पाणीपुरवठा विभाग यांसह अन्य शासकीय, प्रशासकीय विभागांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री गोगावले यांनी हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवर आहे. प्रत्येकाने आपले काम चोख बजावावे अशा सूचना दिल्या.
यावेळी मंत्री गोगावले यांनी प्रत्येक विभागाकडून रायगडच्या पायथ्यापासून ते प्रत्यक्ष गडावर होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला.
यामध्ये वाहनतळ, एसटी गाड्यांचे जाण्या-येण्याचे नियोजन, प्रमुख व आवश्यक ठिकाणी वीजपुरवठा, पिण्याचे पाण्याचे नियोजन, रोपवेच्या वापराच्या वेळा, गडाचा पायथा ते गडावरील कार्यक्रमा दरम्यानची आरोग्य सुविधा, तात्पुरती होणारी हेलिपॅड निर्मिती, रस्ते व दळणवळणाचे नियोजन या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करून यातील त्रुटी व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
०००