वाशी (जि. धाराशिव) येथे शासकीय आयटीआय जागेचा प्रस्ताव तातडीने पाठवा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ०९ : धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे शासकीय आयटीआयसाठी वाशी परिसरात जागा देण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने पाठवावा. शासनामार्फत त्यास तत्काळ मंजुरी देण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

वाशी येथे शासकीय आयटीआयसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार राणा जगजित सिंह पाटील, धाराशिव जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आयटीआयसाठी वाशी येथे शासकीय जमीन देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. तथापि, स्थानिकांच्या विरोधामुळे हा निर्णय रद्द झाला. आता वाशीपासून १० किलोमीटर अंतरावर तेरखेडा गाव परिसरात जागा देण्याचे प्रस्तावित आहे, परंतु यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, जिल्हा प्रशासन, आयटीआयशी संबंधित सर्व अधिकारी यांनी एकत्रितपणे वाशी नगरपरिषदेच्या पाच किलोमीटर परिसरात जागा निश्चिती करून शासनाकडे नवीन प्रस्ताव सादर करावा. शासकीय जमीन असल्यास त्यास तत्काळ मंजुरी देण्यात येईल. अशी जागा उपलब्ध नसल्यास आणि खासगी जमीन असल्यास त्या जागेबाबत कौशल्य विकास विभागाची मान्यता घेऊन प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/