पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडून शिवणी आरमाळ येथील कै. कैलास नागरे कुटुंबाचे सांत्वन

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आज शिवणी आरमाळ (ता.देऊळगाव राजा) येथील कै.कैलास नागरे यांच्या परिवारास सांत्वनपर भेट दिली.

राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी 24 मार्च रोजी आत्महत्या केली होती. पालकमंत्री यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. कुटुंबियांचे सांत्वन केले. राज्य शासनाने या कुटुंबाचे पालकत्व घेतले असून पालकमंत्री म्हणून सर्व जबाबदारी पार पाडेल, अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिले.

पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी आत्महत्या केली होती. या घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेत खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी धोत्रा नंदई व इतर १४ गावांना बंदिस्त पाईपलाईनद्वारे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला असून या गावांना खडकपूर्णाचे १६६० हे सिंचन क्षेत्रासाठीचे पाणी देण्याचा ७० कोटींचा प्रस्ताव नियामक मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळवून १४ गावांना पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्नशील असून कै. कैलास नागरे यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार मनोज कायंदे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, सरपंच कांताबाई सोनपसारे, उपसरपंच संध्या अरसाळ तसेच अन्य अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.