सिंधुदुर्गनगरी दि 10 (जिमाका):- निरीक्षणगृह व बालगृहामध्ये मुला मुलींना घरासारखे वातावरण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. परिस्थितीने पोरकं केल्यानंतर बालगृहांसारख्या संस्था मुलांना मायेचा आधार देतात. त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करत असल्याने ही इमारत अशा मुलांच्या आयष्यामध्ये परिवर्तन घडवून आणणारी एक वास्तू ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अधिनस्त शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, ओरोस सिंधुदुर्ग येथील शासकीय संस्थेची नूतन इमारत जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून पूर्णत्वास आली आहे. या शासकीय नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महिला व बाल विकास सहआयुक्त राहुल मोरे, महिला व बाल विकास विभागीय उप आयुक्त सुवर्णा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, ही इमारत जनतेच्या पैशातून उभी राहिली असल्याने येथील मुलांना अन्य मुलांप्रमाणे सोयी-सुविधा देणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे. मुलांना मनोरंजानाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या जातील. विशेष म्हणजे आहार हा दर्जेदारच असला पाहिजे. आहाराच्या बाबतीत तक्रार प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या मुलांच्या विकासासाठी प्राप्त झालेला निधी योग्य पध्दतीने खर्च झाला पाहिजे याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची राहिल. मी वारंवार या बालगृहाला भेट देणार असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री.पाटील म्हणाले, सर्व सोयी-सुविधांनी युक्त असणारी ही इमारत मुलांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. निराधार आणि अनाथ मुलांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.